Pune : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी; दशभुजा गणपती मंदिराजवळील घटना

पुणे: भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिल्याची घटना पुण्यातील दशभुजा गणपती मंदिराजवळ घडली आहे. परशुराम वैश्यंपायम (८२) असे अपघातात जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत पर्वती पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम वैश्यंपायम हे संध्याकाळी सहकारनगर भागात असलेल्या दशभुजा गणपतीजवळ थांबले होते. त्या ठिकाणाहून भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडेकत ते हवेत उडून रस्त्यावर फरफटत आले. ही घटना पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला होता.
या अपघातात जखमी झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला, अपघातात दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेले हे दोघे जखमी असून त्या दोघांना सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




