पुणे : “ई-फेरफार”मध्ये आता प्रॉपर्टी कार्डचाही समावेश

पुणे – दस्त नोंदणी झाल्यानंतर ऑनलाइनच्या माध्यमातून संबंधित जमिनीच्या सातबारा आणि फेरफार उताऱ्यामध्ये नोंद घेणाऱ्या “ई-फेरफार’ या योजनेत आता प्रॉपर्टी कार्डचाही समावेश करण्यात आला आहे. पुणे शहरातील मिळकतींची खरेदी, हक्कसोडपत्र किंवा बक्षीसपत्र केले असेल तर प्रॉपर्टी कार्डवर त्यांची नोंद घेण्यासाठी आता सिटी सर्व्हेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागण्याची गरज नाही.
दस्त रजिस्टर कार्यालयात तिन्हीपैकी कोणतेही दस्त नोंदणी तुम्ही केल्यानंतर ऑनलाइन त्यांची माहिती सिटी सर्व्हे कार्यालयात जाणार आहे. कोणतीही हरकत आली नाही, तर 21 दिवसांत प्रॉपर्टी कार्डवर त्यांची नोंद घेतली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर राज्यात सहा जिल्ह्यांत ही योजना भूमी अभिलेख कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचादेखील समावेश आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर केवळ 21 दिवसांत त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफारची नोंद घेतली जाणार आहे.
सध्या पारंपरिक पद्धतीने हीच नोंद घेण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. भूमि अभिलेख विभागाने विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्यावर भर दिला आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील जमिनी खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यावर खरेदीदाराची सातबारा उताऱ्यावर नोंद होण्यासाठी ई-फेरफार योजना सुरू करण्यात आली. परंतु, राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सातबारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे. अशा शहरांमधील मिळकतींचा व्यवहार झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने प्रॉपर्टी कार्डवर नोंद घेण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत.
त्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होता. त्यासाठी नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. त्यातून गैरप्रकारांनाही चालना मिळत होती. या सर्व पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्डच्या मिळकतींच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन ई-फेरफार करण्यासाठी “एनआयसी’मार्फत संगणकीय प्रणाली तयार केली आहे.
नोटीसवर हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी
या संगणकीय प्रणालीनुसार प्रापर्टी कार्डवरील मिळकतीची खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर याची माहिती ऑनलाइनने भूमि अभिलेख कार्यालयाला येणार आहे. त्यानंतर त्याची छाननी होऊन लगेचच टिपण्णी होणार आहे. त्यानंतर टिपण्णी मंजूर नोटीस तयार होणार आहे. ही नोटीस ज्यांचे मेल आयडी असतील त्यांना ई-मेलने आणि ज्यांचे पत्ते असतील त्यांना टपालाने पाठविण्यात येणार आहे.
ही सर्व प्रकिया ऑनलाइन आणि एकाच दिवसात होणार आहे. यातील पुढील टप्पा म्हणजे नोटीसवर हरकत देण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे. हरकत दाखल न झाल्यास प्रॉपटी कार्डवरील ई-फेरफार ऑनलाइन तयार होणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.





