Pune : गाडी नादुरुस्त झाल्याने… उरुळी देवाची येथील पर्यटक श्रीनगर येथे सुखरूप

कोंढवा – पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला, त्यादिवशी सायंकाळी आम्ही पहलगाम येथे मुक्कामाला जाणार होतो. मात्र, रस्त्यातच आमची गाडी नादुरुस्त झाल्याने श्रीनगर येथेच मुक्काम केला. सध्या, येथे लष्कर मोठ्या प्रमाणात गस्त घालत असून सर्वांना बिनधास्त राहण्याचे आवाहन केले जात आहे, अशी माहिती श्रीनगर येथून उरुळी देवाची येथील भगवान भाडळे व उंड्री येथील सुभाष कड यांनी मोबाईलद्वारे दिली.
काश्मीर येथे पर्यटनासाठी उंड्री, देवाची उरूळी, ससाणेनगर येथील सुभाष कड, रेखा कड, भगवान भाडळे, सुरेखा भाडळे, सुधीर ससाणे, भाग्यश्री ससाणे, धनश्री ससाणे हे सहलीसाठी गेले आहेत. पहलगामला जाताना रस्त्यात गाडी नादुरुस्त झाल्याने वेळ झाला व नंतर हल्ल्याची बातमी समजताच श्रीनगर येथेच सुरक्षित ठिकाणी त्यांनी मुक्काम केला असून, ते तातडीने पुण्याकडे निघण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारने तातडीने पाकिस्तानच्या नाग्या ठेचायला हव्यात. घडलेला प्रकार भयानक आहे. यापुढे येथे पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या निश्चित घटणार आहे. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त पर्यटकांनी काश्मीर सोडले असून अनेकजण परतीच्या मार्गाला लागले आहेत. उरूळीदेवाची, फुरसुंगी कचरा डेपोचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी मोबाइलद्वारे काश्मीर येथून माहिती दिली.





