Pune Drainage Issue: पावसाळी वाहिन्यांचा भार ड्रेनेजवर! थेट घरांमध्ये साचतंय घाण पाणी; पुणेकरांचे आरोग्य धोक्यात
Pune Drainage Issue: ओढे आणि नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे पाण्याचा नैसर्गिक विसर्ग रोखला; ड्रेनेज वाहिन्यांची क्षमता संपल्याने अतिरिक्त घाण पाणी घरांमध्ये घुसले.

Pune Drainage Issue – शहरात पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेज वाहिन्या स्वतंत्र असणे आवश्यक असताना अनेक भागांत पावसाळी वाहिन्या थेट ड्रेनेजला जोडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये साचून आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. प्रामुख्याने दांडेकर पूल, कोंढवा, भवानी पेठ, शिवाजीनगर, जनवाडी, केळेवाडी, वारजे रामनगर या वस्तींसह कोथरूड, विधी महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता, सिंहगड रस्ता,
तसेच मध्यवर्ती पेठांमध्येही पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर येते. मात्र, आता जमिनीखाली जाऊन या दोन्ही वाहिन्या पुन्हा स्वतंत्र करणे शक्य नसल्याने या समस्येचा सामना नागरिकांना वर्षानुवर्षे करावा लागत आहे. शहराचा आकार बशीसारखा असून, बहुतांश भाग सखल आहे, तसेच शहरात अनेक टेकड्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात टेकड्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी सखल भागात वाहून येते.
जेथून नाले किंवा ओढे सुरू होतात, तेथे अतिक्रमणे झाल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडून ते पाणी शहरातील रस्त्यांवर साचते. त्यामुळे महापालिकेकडून शहरात पावसाळी गटारांचे जाळे उभारणे आवश्यक आहे. महापालिकेच्या माहितीनुसार शहरात सुमारे २,४०० किलोमीटर लांबीचे सहा मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते आहेत. मात्र, या रस्त्यांवर अवघ्या ३५८ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या आहेत.
या वाहिन्यांचा निचरा थेट नदीपात्रात होणे अपेक्षित असताना, नियोजनाचा अभाव आणि कामांवरील दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी त्या थेट ड्रेनेजला जोडल्या आहेत. परिणामी, पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र होते. हे अतिरिक्त पाणी वाहून नेण्याची क्षमता ड्रेनेज वाहिन्यांमध्ये नसल्याने घाण पाणी रस्त्यावर, तसेच वस्त्यांमधील घरांमध्ये घुसते.
बांधकामांकडे दुर्लक्ष
शहरात नवीन घरे, इमारती आणि मोठमोठी गृहसंकुले उभारताना त्यांना पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज आणि रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, प्रामुख्याने मोठ्या बांधकामांना परवानगी देताना काही मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. बांधकामातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे का? ती व्यवस्था जवळच्या पावसाळी गटाराला किंवा नाल्याला अधिकृतपणे जोडलेली आहे का? संबंधित नाला अतिरिक्त पाणी वाहून नेण्यास सक्षम आहे का?बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यापूर्वी पावसाळी जलनिचऱ्याची प्रत्यक्ष चाचणी केली जाते का, याबाबत कोणतेही उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.
“शहरात अनेक भागात ड्रेनेज आणि पावसाळी वाहिन्या एकत्र जोडल्या आहेत. त्या स्वतंत्र करण्यासाठी आराखडा केला जात आहेस तर काही भागांत कामेही सुरू केली असून, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी सर्व संबधित विभागांना आयुक्तांच्या स्तरावर सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.”
– दिनकर गोजारे, ड्रेनेज विभागप्रमुख






