Pune : नालेसफाईची कामे हाती घ्यावीत; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे हाती घ्यावीत. ही कामे पारदर्शक पद्धतीने करावीत, अशी मागणी शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली नाही तर शिवसेना स्टाइलने महापालिकेत आंदोलन करू, असा इशाराही धंगेकर यांनी दिला आहे.
शहरात अवकाळी पावसामुळे सगळीकडे पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार धंगेकर यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना पत्र पाठवले आहे. पत्राद्वारे त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
माजी आमदार धंगेकर म्हणाले की, पुणे शहरात मंगळवारी तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळजवळ सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक भागात नाले, चेंबर तुंबले होते. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रमाण क्षणाक्षणाला वाढत गेल्याने अनेक भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. परिणामी, पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. शिवाय, भर पावसात वाहतूक कोंडीतही अडकून रहावे लागले.
मे महिन्यांत केवळ तासभर झालेल्या अवकाळी पावसातील ही स्थिती. पावसाळा अजून सुरूही झालेला नाही. त्याआधीच पुणेकरांना रस्त्यावर साचलेल्या, घरात घुसलेल्या पाण्यात अडकून रहावे लागले. त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. महापालिकेबाबत रोष व्यक्त केला जात आहे. पावसाळी कामांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले अशीच नागरिकांची भावना आहे. त्यामुळे संबंधितांवर काय कारवाई केली, हे आपण प्रथमतः जाहीर करावे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.





