Pune: महापालिकेची नोकरी नकोच…

पुणे – महापालिकेच्या तब्बल ७१ कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरात नोकरी सोडल्याचे समोर आले आहे. वाढते नागरीकरण, कामाचा व्याप, शासकीय कामकाजाची बदलती कार्यपद्धती यामुळे आरोग्य तसेच मानसिक ताण वाढत असल्याचे सांगत अनेकांनी नोकरी सोडली आहे.
तर, जुन्यांपैकी १३ कर्मचाऱ्यांनी निवृत्तीआधीच व्हीआरएस घेतली आहे. हे प्रमाण पाहता प्रत्येक पाच दिवसाला एक कर्मचारी पालिकेला रामराम करीत असल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेत गेल्या दहा ते बारा वर्षे न्यायालयीन वाद तसेच सेवा प्रवेश नियमावली अंतिम नसल्याने नवीन नोकरभरती झालेली नव्हती. या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे कंत्राटी सेवकांच्या माध्यमातून कामे होत होती.
मात्र, शासनाने भरतीवरील स्थगिती उठविल्यानंतर या महापालिकेने २०२२ मध्ये १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांच्या ४४८ जागांची भरती प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ९ पदांवरील ३२० जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. यात दोन टप्प्यात आत्तापर्यंत ८०८ पदांची भरती केली. यातील लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, विभागीय वैद्यकीय अधिकारी यासह अन्य काही पदावरील अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने ७१ जागा रिक्त झाल्या आहेत.
स्पर्धा परिक्षांचे सर्वाधिक उमेदवार…
महापालिकेच्या कामाचा राजीनामा देणाऱ्या कर्मचारी बहुतांश तरूण हे स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे आहेत. त्यामुळे अनेकांनी इतर शासकीय विभागांचीही परिक्षा दिलेली होती. त्यामुळे मोठ्या शासकीय पदावर नियुक्ती होत असल्याने अनेकांकडून आपल्या पदाचा राजीनामा दिला जात आहे.
मात्र, कर्मचारी, अधिकारी नोकरी सोडून गेल्यास त्या ठिकाणी प्रतिक्षा यादीतील उमेदवाराला संधी मिळते. मात्र. पालिकेने नोकरी सोडणाऱ्यांपैकी अनेकजण एक वर्ष पूर्ण करून जात असल्याने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनाही संधी मिळत नसल्याने महापालिकेची अडचण वाढली आहे.
नोकरी सोडणाऱ्यांची आकडेवारी….
लिपिक – ३७
फायरमन – ८
औषध निर्माता – २
वाहन निरीक्षक – २
कनिष्ठ अभियंता – १०
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक- ९
विभागीय वैद्यकीय अधिकारी -३
आतापर्यंतची स्वेच्छा निवृत्ती – १३





