PUNE: शिस्तीत पक्षाचे काम करा; काॅंग्रेस प्रभारींनी पदाधिकार्यांना सुनावले

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे काम शिस्तीत करा, पक्षाच्या विरोधात जे काम करतील तसेच ज्यांच्यामुळे पक्षाच्या भूमिकेला तडा जाईल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा शब्दात काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शहर काॅंग्रेस पदाधिकार्यांचा वर्ग घेतला. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकार्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये पुन्हा एकदा पदाधिकार्यांमधील धूसफूस चेन्नीथला यांच्या समोरच उघड झाल्याचे पाहायला मिळाले.
मात्र, या बैठकांसाठी संपूर्ण दिवसभर काॅंग्रेसभवनमध्ये गोंधळाचे वातावरण दिसून आले. काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आमदार विश्वजित कदम, रवींद्र धंगेकर, बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी बुथ कमिटीच्या कामाचा आढावा घेतला, तसेच लोकसभेसाठी तयारी ठेवावी, अशा सूचनाही चेन्नीथला यांनी केल्या. तसेच जे पक्षाचे काम करणार नाहीत त्यांना घरी बसवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्यांची मर्जी त्यांनी भाजपात जावे
या बैठकीत काही पदाधिकार्यांनी निवडणुकांच्या तोंडावर अनेकजण भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. याबाबतही चेन्नीथल यांनी थेट वक्तव्य करत ज्यांची मर्जी आहे, त्यांनी भाजपमध्ये जावे. ज्यांची विचारधारा काॅंग्रेसची आहे ते काॅंग्रेस कधीच सोडणार नाहीत. मात्र, जे जातील त्यांच्या विरोधात आम्ही काॅंग्रेस म्हणून लढू, असा सूचक इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसेच, पक्षाकडून जी बुथ कमिटीची यादी दिली आहे. ती यादी खरी की खोटी हे आपण स्वत: फोन करून तपासणार असल्याचे ते म्हणाले.
वंचितबाबत अद्याप निर्णय नाही
महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे काॅंग्रेस प्रभारी चेन्नीथाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करण्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे चर्चा करत आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असून आंबेडकर यांना महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यासाठी काँग्रेस देखील सकारात्मक आहे. याबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.





