Pune : लग्न झालेल्या दिवसापासून विभक्त राहणाऱ्या जोडप्याचा दुसऱ्या तारखेलाच घटस्फोट

पुणे – घरच्यांच्या परस्पर प्रेमविवाह केल्यानंतर एक दिवसही संसार न करता एक वर्षे वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दांपत्याचा घटस्फोट दुसऱ्या तारखेला कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर.पहाडे यांनी मंजुर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे मोठा कालावधी विभक्त राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो.
या प्रकरणात दोघे लग्न झालेल्या दिवसापासून म्हणजेच एक वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. पत्नीच्या वतीने ऍड. राणी कांबळे-सोनावणे, ऍड. ज्ञानदा कदम यांनी काम पाहिले. तर पतीच्या वतीने ऍड. चेतना फटाले यांनी काम पाहिले. दोघेही 28 वर्षांचे आहेत. दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होते. ओळखीतून प्रेमही झाले होते. त्यातून मे 2022 मध्ये दोघांनी घरच्यांच्या परस्पर नोंदणी पध्दतीने प्रेमविवाह केला. त्यानंतर ती तिच्या घरी, तर तो त्याच्या घरी राहत होता.
दोघेही उच्चाशिक्षित असून, दोघेही नोकरी करतात. लग्नाच्या काही कालावधीनंतर दोघांच्या घरच्यांना लग्नाबाबत कळले होते. दरम्यान वैचारिक मतभेद आणि स्वभावातील विभन्नतेमुळे त्यांच्यात वाद झाले. हा वाद कौटुंबिक न्यायालयात पोहोचला. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
प्रेम प्रकरणातून विवाह करताना पती-पत्नी दोघांनी विचार केला पाहिजे. अन्यथा या गोष्टीचा दोघांना आणि त्यांच्या घरच्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. दोघांनी एक दिवसही संसार केला नसून, लग्नापासून एक वर्षे दोघे वेगळे राहत होते. परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास दोघेही तयार असल्याने आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
– ऍड. राणी कांबळे-सोनावणे (पत्नीच्या वकील)




