Pune District: इडली सेंटरमध्ये सांबारमध्ये आढळला किडा

वाघोली : व्हेज क्रिस्पीची ऑर्डर दिल्यानंतर चिकन क्रिस्पीची चव वाघोलीतील एका व्यक्तीस चाखावी लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच वाघोली येथील एका इडली सेंटरच्या सांबारमध्ये मृत कीटक आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत कुटुंबाने हॉटेलमधील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वाघोली येथील कुटुंबाने नाष्ट्यासाठी इडली आणि सांबार मागवले होते. तथापि, जेव्हा त्यांनी जेवायला सुरुवात केली तेव्हा सांबारमध्ये मृत कीटक आढळून आल्याने त्यांना धक्का बसला. कुटुंब घाबरले आणि त्यांनी ताबडतोब भोजनालयाशी संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. कुटुंबाने इथल्या अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित सेंटरने घटनेबद्दल माफी मागितली. कुटुंबाला आश्वासन दिले की, ते अन्नस्वच्छतेकडे गांभीर्याने पाहतात. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता करण्याचे घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कुटुंबाने अन्न स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती दिली. वाघोलीतील हॉटेलच्या स्वच्छता मानकाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.





