Pune District : भीमाशंकर कारखाना अडचणीत आणण्याचे काम सुरू – देवदत्त निकम

मंचर : पारगाव दत्तात्रयनगर (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने अद्यापही नोंद असलेले ऊस तोडले नाही. एक लाख टन ऊस बाहेरून आणला. यामध्ये कारखान्याला वाहतुकीवर मोठा खर्च करावा लागला.
तालुक्यात ऊस असतानाही बाहेरून ऊस आणण्याची गरज काय होती ? त्यामुळे भीमाशंकर कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे, असा आरोप भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी गुरुवार, दि.१३ रोजी केला.
पारगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम बोलत होते. यावेळी संजय बढेकर, प्रभाकर दाभाडे, माऊली ढोमे, शरद बोंबे,विशाल भोर,गोविंद नाना खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निकम म्हणाले की, भीमाशंकर कारखान्यातून बाहेर जाणाऱ्या स्क्रबमध्ये मोठा काळा बाजार होत असल्याची तक्रारी बऱ्याच दिवसापासून सुरू माझ्याकडे येत आहे.
याबाबत मी स्वतःजाऊन पाहणी केली असता स्क्रॅपच्या गाड्यांमध्ये लोखंडाबरोबर अॅल्युमिनियम देखील पाठवले जात असल्याचे निदर्शनात आले आहे.स्क्रॅपच्या लिलावात लोखंड ४३ रुपये किलो व अॅल्युमिनियम २०० रुपये, असे ठरले असून लोखंडाबरोबर अॅल्युमिनियम नेले जात असल्याने किलोमागे १५७ रुपयांचा तोटा कारखाना सहन करत आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी केला.





