Pune District : राजगुरूनगरातील महिला आक्रमक

पाण्यासाठी मोर्चा काढत मुख्याधिकार्यांना घातला घेराव
राजगरूनगर – पावसाळा असताना आणि पाण्याची कमतरता नसताना राजगुरूनगर शहरातील काही भागात दिवसाआड नळाला पाणीपुरवठा होतो. यावरून संतप्त महिलांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना मंगळवारी (दि 24) घेराव घातला.
राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत महिन्यांपासून स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नाही. त्यातच अलीकडे काही दिवसांपासून दिवसाआड आणि तेही कमी पाणी मिळते नगर परिषदेत अनेकदा तक्रारी करून प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत आहेत. पाण्याची अनियमितता कायम राहिली आहे. अखेर रोजच्या पाणी टंचाईला कंटाळलेल्या महिलांनी नगरपरिषदेवर मंगळवारी अचानक आपला मोर्चा काढला. नगरपरिषदेत मुख्याधिकारी यांना घेराव घातला. शहरातील पांडुरंगनगर तसेच वाडारोड परिसरातील अनेक महिला व पुरुष या पाणी आंदोलनात सहभागी झाले होते.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी आंदोलकांचे यावेळी म्हणणे ऐकुन घेतले. महिलांच्या शकांचे निरसन करून या पुढील एक महिन्यात शहरात येणार्या पाण्याचे योग्य नियोजन करू असा शब्द दिला. राजगुरूनगर शहरात सध्या अनेक कामे सुरु असून त्यामध्ये पाण्याचे नियोजन हे आम्ही सर्वात प्रथम करू असे मुख्यधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले. यावेळी उमा शेटे, श्वेता गारगोटे, शिवानी शेटे, प्रकाश पाचारणे, दिलीप भोर, माणिक निंबाळकर, मच्छिंद्र राक्षे, रेखा श्रोत्रीय, यांच्यासह शहरातील शेकडो महिला नागरिक उपस्थित होते.
गृहिणी उमा शेटे म्हणाल्या, दिवसाआड पाणी येत आहे आणि तेही कमी येत असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. नवीन योजना तत्काळ सुरू केली पाहिजे. ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी आक्रोश करावा लागत आहे. नगर परिषदेने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा महिलांच्या या प्रश्नाला अधिकारी वर्गाला सामोरे जावे लागेल यापुढे मोठे आंदोलन केले जाईल.
शहरातील नागरिकांनी स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न आहे. सध्या शहरात दिवसाआड पाणी सोडले जात आहे. आज शहरातील महिलांनी याबाबत विचारणा केली. वेताळे येथील शुद्धीकरण केंद्रातून येणारी पाइपलाइन रस्त्याच्या कामामुळे कमजोर झाली आहे. काही ठिकाणी तुटत फुटत असून त्यामुळे शाहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.
– अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी, राजगुरूनगर





