Pune District : उजनीची प्रदूषित पाण्यापासून मुक्तता होणार?

पाणी प्रदूषणाच्या अभ्यासाठी दिल्लीचे विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचे संशोधक इंदापूरला भेट देणार
इंदापूर – उजनी जलाशयाच्या पाणी प्रदूषणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी थेट दिल्लीहून विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचे संशोधक विशेष बैठकीसाठी येत आहेत. या बैठकीचे आयोजन रविवारी (दि. 7) इंदापूर येथील जय नर्सिंग इन्स्टिट्यूट नर्सिंग कॉलेज दत्तनगर येथे करण्यात आले आहे.
इंदापूर येथे 16 मे रोजी उजनीच्या दूषित पाणी प्रश्नाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी भिगवण या ठिकाणी बैठक घेऊन, दूषित पाणी प्रश्नाची माहिती घेतली. या वेळेला त्यांच्या समवेत जलविरादरी महाराष्ट्र प्रांताध्यक्ष नरेंद्रभाई चुघ, तेलंगणाचे माजी मंत्री व्ही. प्रकाश राव, आंध्र प्रदेशचे सत्यनारायण बोलशेट्टी, हैदराबादचे आकाश पांडे इत्यादी मान्यवर भिगवण या ठिकाणी येऊन उजनी धरणातील प्रदूषित पाण्याची पाहणी केली होती. ही बाब गंभीर असल्याचे जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले होते.
यावर तीव्र आवाज उठवला जाईल, असेही सांगितले होते. कारण उजनीचे पाणी दूषित असून माणसालाच नव्हे तर, प्राण्यांना सुद्धा पिण्यायोग्य नाही. पुणे पिंपरी चिंचवडचे मलमूत्र मुळा, मुठा, इंद्रायणी या पाण्यामध्ये मिसळते. अनेक कंपन्यांची मळी, सांडपाणी, घाण रसायनमिश्रित पाणी या पाण्यामध्ये मिसळत असते. आजूबाजूच्या शेतीला वापरली गेलेली रासायनिक खते सुद्धा या पाण्यात मिसळत असतात. त्यामुळे अनेक जलचर यामध्ये मरून फुगून वर आल्याचे दिसले आहे. म्हणजे हे पाणी पिल्याने अनेक स्वरूपाचे गंभीर आजार होतात. यावरती स्पष्ट भूमिका घेऊन, हा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला जाईल. असे डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी सांगितले होते.
हे संशोधक रविवारी दुपारी 12 वाजता भिगवण येथील बैठकीस उपस्थित राहणार आहेत. एक वाजता पळसदेव येथील बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दोन वाजता इंदापूर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी समस्त नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व या गंभीर समस्येवर आवाज उठवण्यासाठी आपणास सोयीच्या असेल त्या ठिकाणी बैठकीस उपस्थित राहावे. यासाठी भजनदास पवार, भारत मल्हार, मारुती वनवे, प्रकाश ढवळे, रमेश धावडे, सखाराम खोत, प्रा. कृष्णाजी ताटे, हमीद अत्तार, प्रा महादेव चव्हाण, जयवंत नायकुडे, संदिपान कडवळे, भारत बोराटे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वैज्ञानिकांच्या माध्यमातून संशोधन होणार
रविवारी (7 जुलै) भिगवण, पळसदेव, इंदापूर या ठिकाणी दिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचे संशोधक भेट देणार असून, त्यामध्ये स्वाती भाटिया, तारा तन्मय, जान्हवी खत्री आणि महाराष्ट्र बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चूघ हे भेट देणार आहेत. हे संशोधक मच्छीमार शेतकरी नागरिक यांच्याशी संवाद साधणार आहेत. पाहणी करून व मानव पशु जलचरावर काय परिणाम होतो. हे समजून घेणार आहेत. तसेच या गोष्टीवर दिल्लीमध्ये संशोधन केंद्रामध्ये वैज्ञानिकांच्या माध्यमातून संशोधन होणार आहे.
प्रदूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या सर्व हालचालीमुळे प्रदूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार असून, नागरिकांच्या मनामध्ये प्रदूषित पाण्यापासून मुक्तता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यापुढे या प्रश्नावर तीव्र संघर्ष केला जाईल असे आवाहन उजनी पाणी प्रदूषण बचाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे





