पुणे जिल्हा : हवेलीच्या राजकारणाची पोकळी भरून निघणार?

माऊली कटके यांच्या उमेदवारीने पूर्व हवेलीकरांमध्ये जोश
उरुळी कांचन – हवेली तालुक्याच्या जडणघडणीचे प्रणेते दिवंगत माजी खासदार आण्णासाहेब मगर यांच्या पश्चात अनेक दशकांनी पूर्व हवेली तालुक्यातील राजकारणाची निर्माण झालेली पोकळी यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भरुन निघणार काय? अशी परिस्थिती शिरूर- हवेली विधानसभेच्या निवडणुकीत नागरिकांना दिसू लागली आहे.
शिरूर-हवेलीच्या राजकारणात शेवटची संधी म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या माऊली कटकेंना हवेली तालुक्यासह शिरूर तालुक्यात प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून माऊली कटकेंनी आपला उमेदवारी अर्ज 27 ऑक्टोबर रोजी दाखल केल्यानंतर थेऊर येथून श्री चिंतामणी चरणी सुरू झालेला प्रचाराचा झंझावात दोन्ही तालुक्यातील नागरीकांनी गावभेट दौर्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन अधोरेखित केली आहे.
महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी श्री चिंतामणी चरणी नारळ वाढवून सुरू केलेला प्रचाराचा झंझावात शिरूर तालुक्यातील तळेगाव-ढमढेरे, उरळगाव, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, टाळकी हाजी या नागरिकांनी डोळ्यांनी पाहिला. बुधवारी हवेली तालुक्यातील सोलापूर रस्त्यावरील गावागावात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन उरली-सुरली औपचारिकता पूर्ण केल्याने माऊली कटकेंचा विजयाचा वारु चारही बाजूंनी उधळू लागल्याची साक्ष नागरिकांनी देऊन टाकली आहे.
माऊली कटके यांनी आपल्या प्रचारात हवेली तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी, शेती सिंचनाचे घटत चाललेले आवर्तन, शेतकर्यांच्या वीजेचा न सुटलेला प्रश्न, डीपींचा प्रश्न, नर्सरी व्यावसायिकांची नुकसान भरपाई, शेतकर्यांची अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई, गोरगरिबांचा आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान आमदारांनी पाच वर्षांत काही केले नसल्याचे सांगत टीकास्त्र सोडले आहे.
हवेलीची अस्मिता
दरम्यान, शिरूर-हवेलीत मिळणारा प्रतिसाद बघता गावोगावी हवेली तालुक्याची अस्मिता जागृत झाली असून पूर्व हवेली तालुक्याचे अनेक दशकांचे अधुरे स्वप्न यंदा पूर्ण होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.





