पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेने घेतलाय वेग दिवे – पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेची भूसंपादन प्रकिया अत्यंत वेगात सुरू आहे. यापूर्वी शासनाने शेतकर्यांना वेळोवेळी नोटीस पाठवून एक-एक भूसंपादन प्रक्रियेचा टप्पा पूर्ण केला आहे. मागील आठवड्यात शेतकर्यांच्या हरकतीवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता शेतकर्यांशी चर्चा करून बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे. त्याच बरोबर संपूर्ण शेतकर्यांचे ज्याकडे लक्ष लागले आहे तो म्हणजे विमानतळ जागेचा मोबदला काय असेल ? त्याच उत्तर लवकरच मिळणार असून येत्या आठवडाभरात मोबदला जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर मुंजवडी, खानवडी अशा सात गावात शासनाचा विमानतळ प्रकल्प प्रस्तावित असून यासाठी 2832 हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. भूसंपादन प्रक्रियेचा नोटीस आणि त्यावरील हरकती हा मुद्दा आता जवळपास पूर्ण झाला आहे. पुढील काळात आता महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्याने थेट बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्यांशी पुन्हा एकदा चर्चेची फेरी सुरू करण्यात येत आहे. मात्र ही प्रक्रिया सुद्धा केवळ कागदोपत्री दिखावा ठरणार आहे. कारण शेतकर्यांनी कितीही विरोध केला तरी विविध माध्यमातून शासनाने शेतकर्यांची बर्यापैकी माहिती जमा केली आहे. यावर आता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. जाहीर करण्याची औपचारीकता बाकी सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये पुरंदर विमानतळ हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जाण्याची शकयता आहे. विशेष म्हणजे याबाबत आधीच निर्णय घेण्यात आला असून जाहीर करण्याची औपचारीकता बाकी आहे. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार येत्या आठ दिवसात विमानतळासाठी देण्यात येणारा मोबदला जाहीर करण्याची शक्यता आहे. तो जाहीर करण्यापूर्वी विधिमंडळात चर्चा घडवून आणली जात असून त्यादृष्टीने कामकाज सुरु आहे. अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा यावर चर्चा होवून निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गेली अनेक दिवसापासून संपूर्ण राज्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर येत्या आठवडाभरात मिळू शकते. याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.