Pune District : नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण पेटणार?

बळीराजा आक्रमक; पण शासनाकडून काँक्रिटीकरणास सुरुवात
भवानीनगर – नीरा डाव्या कालव्याची दुरुस्ती व डागडुजी दुरुस्ती वेळच्या वेळी न झाल्याने कालवा फुटणे व कालव्याची क्षमता कमी होणे अशा गोष्टी घडत आहेत. परंतु, त्यासाठी अस्तरीकरण (सिमेंट काँक्रिटीकरण) हा एकमेव पर्याय नाही, जर प्रशासनाने अस्तरीकरण हाच पर्याय निवडला तर या परिसरातील सर्व शेतकर्यांचे कधी न भरून येणारे नुकसान होणार आहे व शेतकरी देशोधडीला लागणार आहे तरीही प्रशासनाने अस्तरीकरण करण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना मोठे आंदोलन उभा करेल, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी दिला आहे.
नीरा डाव्या कालव्याला पाणी आले तर विहिरींची पाण्याची पातळी वाढत आहे. त्याचबरोबर या नीरा डाव्या कालव्याला जे फाटे तयार केले आहेत त्या फाट्यातून शेतकर्यांना शेतीसाठी पाणी मिळत आहे. परंतु, अलीकडच्या काळामध्ये या नीरा डाव्या कालव्याकडे दुरुस्तीच्या कामाकडे डोळेझाक होत असल्याने कालवा फुटल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, या कालवा फुटण्याला एक वेगळेच वळण दिले जात असून लगेच या कालव्याला अस्तरीकरण करण्याचा निर्णय घेण्यास हालचाली सुरू झाले आहेत जर का अस्तरीकरण झाले तर शेतकर्यांच्या शेतातील विहिरींना पाणी राहणार नाही शेतकर्यांच्या शेतातील पिके पाण्याविना जळून जातील व कालव्याच्या आजूबाजूच्या शेतीचा प्रश्न निर्माण होईल.
शासनाने अस्तारीकरणापेक्षा नीरा डाव्या कालव्याची डागडुजी व दुरुस्ती करावी. याबाबतचे निवेदन बारामती पाटबंधारे विभाग यांना देखील देण्यात आले आहे. मात्र, तरी देखील नीरा डाव्या कालव्याला अस्तरीकरण करण्यास सुरुवात केली तर शिवसेनेच्या वतीने शेतकर्यांसह मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशा देण्यात आला आहे.





