पुणे जिल्हा : कृष्णा-भीमासाठी लोकसभेत आवाज उठवणार

खासदार धैर्यशील मोहिते पाटील : संसदेत प्रथमच आल्याचा वेगळा आनंद
अकलूज – सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. 2004 मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला जन्म घातला आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशीव व लातुर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनाबरोबर घेवून आपण लोकसभेत आवाज उठवू व ही योजना पूर्ण करण्यासाठी तसेच उजनी जलाशयातील गाळ काढून या धरणाची पाणीपातळी वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी दिले.
खासदार मोहिते पाटील यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथील संसद भवनाला भेट देवून खासदारपदी निवडून आलेल्या प्रमाणपत्राची नोंदणी संदर्भातील कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संसदेत प्रथमच आल्याचा वेगळा आनंद मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, विजयसिंह मोहिते पाटील व स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेचे तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यसभेचे नेतृत्व केले आहे. माझ्यासाठी हा अनुभव नवीन आहे. मी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये काम केले असल्याने संसदेतील कामासाठी मला शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन लाभेल, असे त्यांनी नमूद केले.
फलटण-पंढरपूर हा रेल्वे मार्ग विजयदादांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून मंजूर करुन घेतला होता. तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे जेऊर-चौंडी या रेल्वेमार्गाचाही प्रस्ताव आहे. त्याचा मी पाठपुरावा करणार आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र-मराठवाडा व कोकणला जोडणारा रत्नागिरी-कराड-पंढरपूर-लातुर असा रेल्वेमार्ग निर्माण करण्याचा माझा दृष्टीकोन आहे. या रेल्वेमार्गामुळे कृषी व अध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नमूद केले.
राजकीय दबावला भीक घालणार नाही
मला लोकसभेसाठी जनतेने उभे केले होते व सव्वालाखाच्या मताधिक्याने त्यांनी विजयी केले आहे. माझ्यावर या मतदारसंघातील जनतेचा विकासकामासाठी दबाव असणार आहे. माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही किंवा त्या दबावाला भिणारा मी नाही. भाजप विरुद्ध बंड करायला मला जनतेने भाग पाडले. खासदारांविषयी नाराजी असल्याची कल्पना मी भाजपातील वरिष्ठांना दिली होती; परंतु श्रीकांत भारतीय, आमदार गोरे व आमदार शहाजी पाटील यांच्या सांगण्यावरुन भाजपाने उमेदवार बदलला नाही त्याचा परिणाम काय झाला हे निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
तर कृषी मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाला जोडणा-या मेंढापूर येथे 600 ते 700 एकर शासकीय जमीन आहे. या जमिनीवर कृषी प्रकल्प उभा करुन भविष्यात जर रत्नागिरी येथे माल वाहतूक बंदर उभा राहिले तर मुंबईवर येणारा वाहतुकीचा भार कमी होवून रत्नागीरी येथील बंदरावरुन शेतीमाल वाहतूक करणे सोईचे होइल व यामुळे कृषी मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होइल, असे ते म्हणाले.





