Pune District : घर मिळेपर्यंत नगरपंचायत कार्यालयातून उठणार नाही

– ८० वर्षीय ज्येष्ठ महिला शकुंतला बागल यांनी मांडले ठाण
मंचर – मंचर (ता.आंबेगाव) येथील ज्येष्ठ महिलेचे राहते घर पाडून गायब केले असल्याची तक्रार महिलेने मंचर पोलीस ठाणे व मंचर नगरपंचायत यांच्याकडे केली आहे. मात्र, नगरपंचायत प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने ८० वर्षीय ज्येष्ठ महिला शकुंतला शिवाजी बागल या मंचर नगरपंचायत कार्यालयात बुधवार, दि.१६ रोजी ठाण मांडून बसल्या असून जोपर्यंत माझे मला घर मला मिळत नाही.तोपर्यंत मी मंचर नगरपंचायत कार्यालयातून उठणार नाही.असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतल्याने प्रशासन ही हतबल झाले आहे.
याबाबत शकुंतला शिवाजी बागल, त्यांचे पती शिवाजी मारुती बागल व कुटुंबीय १९६४ पासून मंचर वास्तव्य करत आहेत. त्यांच्या घराला दगड विटा मातीचा पाया होता.पडवी व शौचालयाची सोय होती. २०१९ मध्ये शकुंतला बागल यांचे पती शिवाजी मारुती बागल यांचे निधन झाले. त्यांना पाच मुले होती, त्यापैकी चार मुलांचे अकाली निधन झाले असून पाचवी मुलगी अनुराधाही चिखली (भोसरी) येथे राहते.
शकुंतला बागल या वर्षभरापूर्वी आजारी पडल्यामुळे मुलीकडे उपचारासाठी गेल्या होत्या.
त्यानंतर त्या परत मंचर येथे आले असता त्यांनी गुरुवार, दि.३ रोजी नगरपंचायतीत जाऊन पूर्वी राहत असलेल्या घराची थकीत घरपट्टी व चालू रक्कम अशी एकूण १२३३ रुपये भरले होते. त्यानंतर त्या राहत असलेल्या घराकडे गेल्या असता त्यांना तिथे काहीच दिसले नाही. त्यावेळी त्यांनी तेथील फोटो व घराचे कागदपत्रे जोडून नगरपंचायत प्रशासन व पोलीस ठाणे येथे माझे घर मिळून द्यावे.घर चोरीला गेले आहे.याबाबतचे निवेदन दिले होते.गेल्या आठ पंधरा दिवसांपासून त्या मंचर पोलीस ठाणे आणि नगरपंचायत येथे न्यायासाठी हेलपाटे मारत असून त्यांना अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपंचायतीने नोंद केली होती स्थगित…
शकुंतला बागल यांच्या नावे ग्रामपंचायत काळापासून घराची नोंद होती. मात्र, हे घर आमच्या मालकीच्या जागेत आहे. पण ती आमची मालमत्ता नाही. म्हणून ही नोंद रद्द करावी, असा अर्ज मिराबाई पोखरकर यांनी दि. १७ एप्रिल, २०२३ रोजी मंचर नगरपंचायतीला केला होता. सदर अर्जासोबत त्यांनी चालू दिनांकाचा ७/१२ उतारा व शासकीय मोजणी नकाशा क प्रत सादर केली होती. या अर्जाच्या अनुषंगाने जवळपास वर्षभर या घराचे मालक/ हितसंबंध असणारे वारसाचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू होती. मात्र, त्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर पंचायत प्रशासनातर्फे एका दैनिकात दि. ४ मे २०२४ रोजी वाद असलेल्या घराच्या वारसदार यांना संपर्क करणेबाबत जाहीर आवाहन करण्यात आले. उक्त दिलेल्या मुदतीत देखील कोणीही नगरपंचायत कार्यालयात संपर्क न केल्याने नगरपंचायतीमार्फत सदर पडलेल्या घराची नोंद रद्द/ स्थगित करण्यात आली.
नगरपंचायतीत असलेल्या या दोन्ही कागदपत्रांवर शकुंतला बागल यांच्या नावाचा कोणताही उल्लेख नाही. मात्र, शकुंतला बागल यांनी नगरपंचायत कार्यालयात ठाण मांडले असून त्यांनी महसूल/ भूमि अभिलेख विभाग अथवा न्यायालय यांच्याकडे मालकी हक्क दर्शवणारी कोणतेही दस्तऐवज सादर केल्यास ही नोंद पुन्हा लागू करण्यात येईल.
-वरद थोरात, कार्यालय अधीक्षक, मंचर नगरपंचायत.





