पुणे जिल्हा : भाजपचे प्रदीप कंद लढणार की त्यांची तलवार म्यान होणार ?

शिरूर : भारतीय जनता पक्षाचे शिरूर हवेलीचे नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी शिरूर हवेलीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा निर्धार केला असून हा निर्धार नसून एल्गार आहे. हा एल्गार एल्गारच राहणार की त्यांची तलवार म्यान होणार? हे येणाऱ्या पुढील काही दिवसात दिसून येणार आहे.
प्रदीप कंद यांनी या निवडणुकीतून माघार घेतली तर पुढील काळात त्यांच्या राजकारणालाही उतरती कळा लागणार आहे. त्यामुळे यंदा त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणे गरजेचे असल्याचे मत काही राजकीय जाणकारांचे आहे. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पेरणे फाटा येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निर्धार मेळावा घेऊन “मला तुमच्याशी बोलायचे आहे” या धर्तीवर कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती या बैठकीला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहून प्रदीप कंद यांच्या पाठीमागे ताकद उभे करण्याचे ठरवले आहे.
दि२८ रोजी संदीप भोंडवे यांच्या भाजप संपर्क कार्यालयात निवडणुकीची नियोजन बैठक होणार आहे गेली अनेक वर्ष भाजप आमदार तसेच भाजपचे हवेलीतील प्रथम आमदार म्हणून कायम चर्चेत असलेले प्रदीप कंद हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले असून नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे होता, स्व .बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर भाजपकडे संभाव्य उमेदवार म्हणून प्रदीप कंद यांचेकडे शिरूर हवेली ची जनता पाहत होती. त्यांनी ग्राउंड लेव्हलवर मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी व पक्षाचे काम सुरू केले होते परंतु ही जागा भारतीय जनता पार्टीला न सुटल्याने भाजप कार्यकर्ते व प्रदीप कंद यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
आज तरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले असले तरी ही बंडखोरी त्यांच्यासाठी आवश्यक असून करो या मरो अशी स्थिती त्यांना यावेळेस करावीच लागेल .अन्यथा पुढील काळामध्ये हवेलीचे नेतृत्व दुसरीकडे जाईल व प्रदीप कंद यांचे राजकारणाला उतरती कळा लागल्याशिवाय राहणार नाही.
प्रदीप कंद गेली तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या जवळ होते परंतु तीनही वेळा त्यांना हुलकावणी मिळाली आहे यंदा भारतीय जनता पार्टी कडून एक तरुण उमदा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.परंतु यावेळी त्यांच्या पदरी घोर निराशा आली आहे.





