Pune District : वन्यप्राण्यांचा शेतात धुमाकूळ ; पिकांचे नुकसान

बळीराजा विविध युक्त्या वापरून थकला
वाल्हे – आडाचीवाडी (ता. पुरंदर) व परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून रानडुक्कर, हरीण, मोर, खाडी यांनी मोठा धुमाकूळ घातला आहेत. वन्यप्राण्यांपासुन होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या करुन थकले आहेत.वाघर लावणे, फटाके फोडणे, ओरडण्याचा आवाज, बुजगावणे, साड्यांचे कुंपण असे विविध पर्याय वापरले जातात.हे पर्याय वन्यप्राण्यांना नित्याचे झाल्याने त्याचा पाहिजे तितका फायदा होताना दिसत नाही.
आडाचीवाडी परिसरात उसाचे व फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत असून हे वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करीत आहेत. वन्य प्राण्यांनी आडाचीवाडी येथील शेतकरी मंगल पवार, अनिता पवार, शीतल पवार, आनंद पवार, श्रीकांत पवार, दत्तात्रय पवार आदींसह शेतकरीवर्गाचे वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले आहे.
आडाचीवाडी व परिसरात मागील दीड महिन्यांपूर्वी समाधानकारक पाऊस झाला असून येथील शेतकरीवर्गाने खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी केली आहे. सद्यःस्थितीत उत्तम आलेल्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान करण्यात येत असल्याने येथील शेतकरीवर्ग पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकर्यांना पिकांना रखणी करिता दिवस-रात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच हरणे, रानडुक्कर, मोर आदी वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
या पिकांचे सर्वाधिक नुकसान
मका, बाजरी, ऊस, भुईमूग, मेथी, कोथिंबीर, घेवडा, तसेच फळबागांचे व विविध प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान दररोज हे वन्यप्राणी करीत असून यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडत असून या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानभरपाईची मागणी येथील शेतक-यांनी केली जात आहे.





