Pune District : शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी पोलीस दलात

नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथील रहिवाशी असलेली आणि मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेले पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकपदी थेट नियुक्तीचे आदेश दिले.
मंत्रालयात झालेल्या समारंभात कल्पना पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य शासनाचे आभार मानले. ही नियुक्ती अंबादास पवार यांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान म्हणून करण्यात आली आहे.
26/11 च्या हल्ल्यात अंबादास पवार यांनी अतिरेक्यांच्या हल्ल्याचा प्रतिकार करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते. कल्पना पवार यांनी आपल्या पतीच्या बलिदानाला साजेसे कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यांनी म्हटले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी आणि शहीदांच्या कुटुंबीयांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे ही नियुक्ती म्हणजे शहीदांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारा निर्णय असल्याचे कल्पना पवार यांनी सांगितले. कल्पना पवार यांच्या नियुक्तीने त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असून त्यांच्या कुटुंबात आणि नीरा शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.





