सांगवीत अजित पवार यांचा विरोधकांना सवाल माळेगाव – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी तीन पॅनलकडून अध्यक्ष पदाचा उमेदवार का जाहीर करीत नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. सांगवी येथे नीलकंठेश्वर पॅनलच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे व माजी चेअरमन रंजन तावरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले की, माझ्यात काम करण्याची ताकद आहे. त्यामुळे राज्यातील दोनशे साखर कारखान्यांमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याला वैभवशाली बनवू शकतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभा करू शकतो. कृषी, सहकार, अर्थ, एक्साईज सर्व खाते आपल्याकडे आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी सभासदांना दिला. मी पाच वर्षात सीएसआर फंडातून २५ कोटी रुपयांचा निधी माळेगावसाठी उपलब्ध करून देईन, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. माळेगाव कारखाना कर्जबाजारी झाल्याचे सांगतात. विरोधक वारेमाप खोटे बोलत आहेत. जर कारखाना कर्जबाजारी असता तर अहो सहकार महर्षी दोनशे रुपयाचे कांडे बिल देता आले असते का, असा सवाल त्यांनी चंद्रराव तावरे यांना केला. साखर भिजली असेल तर पॅनल मागे घेतो पवार म्हणाले की, ६० हजार पोती साखर भिजल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. जर गोदामातील ६० हजार पोती साखर भिजली असेल तर मी माझे पॅनल मागे घेतो. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला आहे. इतर सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. शेकडो कोटींचा निधी संस्थांसाठी मी उपलब्ध करून देत आहे. तरी विरोधक मी सहकार मोडीत काढायला निघालो, असे कसे म्हणू शकतात. विरोधक सभासदांची दिशाभूल करीत आहे.