Pune District : इतना सन्नाटा क्यू है भाई?

वडापुरी : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षाांसनू रखडल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे मिनी सभागृह म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते; मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून न्यायालयात असलेल्या प्रलंबित याचिकेमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पुणे जिल्ह्यात गटांची संख्या 7 ने तर गणांची संख्या 14 ने वाढणार असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या गट-गण रचनेत मोठे फेरबदल होणार की पूर्वीचेच गट गण राहणार.? ही इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जुन्या मतदारसंघात तयारी केलेली इच्छुक आता या चर्चेमुळे धास्तावले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकाची घोषणा होण्याची शक्यता आहे; परंतु निवडणुकांची अनिश्चितता असल्याने भावीउमेदवारांची घालमेल सुरू असून पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या आशेने गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या मेहनतीवर (खर्चावर) पाणी फिरण्याची वेळ आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी अनेकांची इच्छा असते. विधानसभेत जाण्यासाठी ही प्रमुख महत्त्वाची पायरी समजली जाते. त्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात नेतृत्व करण्याची संधी याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून निर्माण होते.
राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जिल्हा परिषदेपासून केली होती. सध्या निवडणूक खोळंबल्याने अनेकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. त्याला भरीत भर म्हणून जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर किंवा नाही झाली तर कशी तयारी करायची, गट गण अद्यापही निश्चित नसल्याने उमेदवार मात्र संभ्रम अवस्थेत आहेत. चालू वर्षात निवडणूक होईल या आशेवर इंदापूर तालुक्यातील अनेक भागात सार्वजनिक कार्यक्रम घेतले जात होते. दुःखद घटनेत किंवा लग्नकार्यास उपस्थित राहण्याची चढाओढ पाहायला मिळत होती; परंतु तीन वर्ष होऊनही निवडणुका न झाल्याने भावी उमेदवारांनी खर्च आखडता घेतला असल्याचे दिसून येते.
इंदापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती प्रशासक असल्याने इतना सन्नाटा क्यू है भाई, असं कार्यकर्त्यांमध्ये वातावरण आहे. दरम्यान इंदापूर तालुक्यात होणार्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढवणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकार्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विकासाला खीळ
तीन वर्ष सभागृह अस्तित्वात नसल्याने ग्रामीण भागातील विकासाला खीळ बसली आहे. अनेकांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून संपर्क दौरा सुरू ठेवला आहे. पण या निवडणुकीनंतर ही स्वराज्य संस्था निवडणुका न लागल्याने इच्छुकांच्या तोफा थंडावल्या आहेत. न्यायालयाचा निकाल स्पष्ट न झाल्याने निवडणुका लाबणीवर जाण्याची शक्यता आहे. अशातच मतदारसंघांची पुनर्रचना होण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुका खोलांबल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी योजनांचा विसर पडला आहे. त्यामुळे इच्छुकांची कसरत पाहायला मिळत आहे.
पक्षप्रवेशाचे सोहळे रंगणार
संभाव्य पुनर्रचनेनुसार इंदापूर तालुक्यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती गट गण वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी इंदापूरमध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवलेले प्रवीण माने काय भूमिका घेणार? हे पण महत्त्वाचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर तालुक्यात अनेक बदल घडणार असून पक्षप्रवेशाचे सोहळे रंगणार असल्याची चर्चा आहे.





