पुणे जिल्हा : दोष कोणाचा अन् जबाबदार कोण?

इंग्रजकालीन पोलीस कोठडीतून पळालेला आरोपी गायबच
अरुणकुमार मोटे
सविंदणे – शिरूरच्या इंग्रजकालीन पोलीस कोठडीतून आरोपी कौले उचकटून पळून गेला. मात्र, आता यात दोष सार्वजनिक बांधकाम विभागाचा की पोलिसांचा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अजूनही पोलिसांच्या हाती तुरी देवून पळालेला हा आरोपी मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
शिरूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कोठडीत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी रेवण ऊर्फ रोहन बट्टीबिरू सोनटक्के (रा. वारजे माळवाडी पुणे) हा अटकेत होता. अटकेत असताना आरोपी रोहन याने पोलीस कोठडीमधील बंद खोलीची कौले उचकटून पहाटेच्या सुमारास पलायन केले. मात्र, या घटनेवर दृष्टिक्षेप टाकला असता ही कोठडी असलेली इमारत इंग्रजांच्या काळातील असून तिची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे.
कोठडीत चार खोल्या आहेत. इमारत जुनी झालेली आहे. इमारतीस पाठीमागील बाजूस संरक्षक भिंत नाही. वरील बाजू कौलारू असून ते जीर्ण व मोडकळीस आलेली आहेत. डागडुजी करण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी 2020 मध्ये उपअभियंता बांधकाम विभाग शिरूर यांना पत्र दिले होते. या पत्राची दखल घेत बांधकाम विभागाने त्याचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठविण्यात आले होते. मात्र, त्यावर निधी न पडल्याने ते काम तसेच राहून गेले.
नुकतीच कोठडीतून आरोपीने पलायन केल्यानंतर जिल्ह्यात शिरूर पोलीस स्टेशनचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. पोलीस कोठडीत पावसाळ्यात सातत्याने डासांची मोठी पैदास होते. यावेळी कोठडीतील आरोपींची बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यावेळीही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. मग आता तरी प्रशासन खडबडून जागे होणार का? की कोठडी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांचा बळी देणार, या काळजीमुळे पोलीस अस्वस्थ आहे.
पोलीस प्रशासनापेक्षा लालफितीचाच फटका
सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच शासनाने वेळीच या गोष्टीची दखल घेतली असती तर अशी घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी पोलिसांवर दोष गेला असला तरी प्रथमदर्शनी यात पोलिसांची कोणतीही चूक असल्याचे दिसून येत नाही. जीर्ण झालेली कौलारू खोली व यामागील सत्य हे पाहणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. पोलीस प्रशासनाकडून निधीसाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, लालफितीचा कारभार सुरू असल्याने आरोपीचे पलायन हे भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे.





