Pune District : लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे?

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार तरी कधी?
चाकण – चाकण आणि परिसरात असणार्या कारखानदारीने बेसुमार वाढलेली वाहनांची संख्या, अपुरे रस्ते, सततची वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक, प्रशासन आणि प्रशासकांची सुरू असलेली गळचेपी भूमिका आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चाकणच्या मार्गांवर रोज होणार्या जीवघेण्या अपघातात एक तरी बळी जातोय तर एखादा कायमचा जायबंदी होत आहे. मात्र कोणत्याही राजकीय पुढार्याला लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे मतांसाठी दारोदार फिरणारे लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे? असा संतप्त सवाल नागरिक विचारात आहेत.
चाकण शहरातून जाणार्या महामार्गावरील तळेगाव – चाकण,पुणे – नाशिक मार्गांसह आंबेठाण रस्ता आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक रस्त्यांवर वाहतुक कोंडीचा प्रश्न दररोज भेडसावतो आहे.परंतु,त्यावर तोडगा काढण्यात राजकीय नेते,प्रशासन,पोलिस खात्याला अपयश आले आहे.तास अर्धा तास जागेवर वाहने उभे राहत असल्याने इंधन,वेळ वाया जात आहे.पुणे- नाशिक महामार्गावर तसेच चाकण -तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. चाकणला वाहतूक कोंडीचे ग्रहण हे लागले आहे. हे ग्रहण काही सुटत नाही अशी भयानक अवस्था आहे. वाहनांच्या अगदी एक, दोन किलोमीटर रांगा लागत आहे. त्यामुळे नागरिक,प्रवाशी,कामगार, विद्यार्थी सारेच संतप्त झाले आहेत.
सकाळ पासूनच पुणे नाशिक महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या सुमारे एक ते तीन किलोमीटर रांगा लागलेल्या असतात. कोंडीत सापडलेली वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलीस कर्मचारी व त्यांना सहाय्य करणारे ट्राफिक वार्डन यांची तारांबळ उडते . पुणे नाशिक महामार्गावर स्पाईन रोड सिग्नल पासून, मोशी चौक,भारत माता चौक, चिंबळी, मोई फाटा, कुरळी फाटा, स्पायसर चौक, आंबेठाण चौक (संत सावता माळी चौक) वाकी, रोहकल फाटा या चौकात सिग्नलला वाहतुकीच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात.
श्रेय लाटण्यात बिझी
दिवसेंदिवस वाढणार्या वाहतूक समस्येकडे विकासकामांचे फ्लेक्स लावून श्रेय लाटणार्या राजकीय नेत्यांना लक्ष द्यायला वेळ नाही,अशी टीका नागरिकांनी केली आहे.
एलिव्हेटेड कॉरिडॉर कागदावरच
2014 मध्ये नाशिक फाटा ते चांडोली, राजगुरूनगरपर्यंतच्या महामार्गाचे सहापदरीकरण मंजूर करण्यात आले होते.त्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तत्कालीन कारभार्यांनी विरोध केला.परिणामी हा प्रकल्प लांबला. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते चांडोली आणि चाकण ते तळेगाव एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे दुमजली रस्ता करण्याच्या घोषणा झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार आहे.हे कुणी स्पष्ट सांगत नाही. तोपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या अशीच राहणार का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाहतूक कोंडी आणि वाहतूक पोलीस –
चाकण आणि औद्योगिक वसाहतील वाहतूक नियमन सुरळीत होण्यासाठी चाकण वाहतूक शाखेतून महाळुंगे वाहतूक शाखा वेगळी करण्यात आली.परंतु वाहतूक कोंडी जैसे थैच राहिली आहे.वाहतूक नियमन करण्यात चाकण आणि महाळुंगे वाहतूक शाखा फेल झाल्या असल्या तरी दंड वसुलीमध्ये एक नंबरवर असल्याचे काही पोलीस कर्मचारी खासगीत बोलून दाखवत आहेत.
चाकण : येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.





