पुणे जिल्हा : पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी सुटणार कधी?

वाघोलीकरांचा प्रश्न : वाढत्या नागरीकरणाला सुविधा पुरवण्यास प्रशासनाची कसरत
वाघोली – वाघोली मधील समस्या सोडवण्यासाठी वाघोलीकर चर्चा, भेटीगाठी, निवेदने, आंदोलने करून देखील समस्यांना प्रशासनाकडून वारंवार देण्यात आलेल्या पोकळ आश्वासनांनी वाघोलीच्या समस्या सुटणार का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वाघोलीमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांत अनेक छोटे-मोठे गृहप्रकल्प पूर्ण होऊन वाघोलीच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. ही लोकसंख्या जवळपास 3 ते 4 लाखांच्या आसपास पोहचली आहे. तीव्र पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्ते, सांडपाणी या समस्येस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गावची चालु असणारी पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्यमुळे तुटपुंजी पडत आहे, काही ‘वाड्यावस्त्यावर 10-10 दिवस पाणी येत नाही, तसेच काही वाड्यावस्त्या व अनेक गृहप्रकल्पांना तर अद्यापपर्यंत पाणीपुरवठा झालाच नाही. तसेच अनेक गृहप्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याने भविष्यात पाण्याची समस्या भयंकर रूप धारण करेल.
राज्य सरकारकडून भामा-आसखेड प्रकल्प योजनेचे पाणी वाघोली गावास मिळणार आहे, असे काही वर्षापासून आश्वासन देण्यात येत आहे; परंतु आजतगायत कोणतेही ठोस काम झालेले नाही. तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत लोणीकंद वाहतूक शाखा स्थापन करून देखील वाहतूक कोंडी दूर करण्यात अद्याप पावतो यश आले नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस विदारक स्वरूप धारण करू लागले असल्याने या समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाघोलीच्या विविध समस्यांसाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राहुल कुल, प्रदीप कंद यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विभागांच्या बैठका घेऊन वाघोलीसाठी भरून निधी, सांडपाण्याच्या प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यानुसार निधीची देखील तरतूद करण्याचे आदेश तत्कालीन चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. वाघोलीच्या विकासासाठी यापुढील काळात पाठपुरावा सुरूच राहील.
-रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक भागात टॅंकरने पाणीपुरवठा व्हावा. तसेच झचठऊच्या माध्यमातून होणारी 5 एमएलडी पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी. याशिवाय भामा आसखेड योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत मागणी केली आहे.
-शांताराम कटके, माजी उपसरपंच वाघोली
वाहतूक कोंडी…
पुणे-नगर- औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर आधीपासूनच प्रवासी वाहने व औद्योगिक वसाहतीच्या वाहनांची भरपूर प्रमाणात वर्दळ आहे. त्यात वाघोली गावांमध्ये नव्याने पूर्ण झालेले व प्रगतीपथावर असणारे मोठ-मोठे गृहप्रकल्प तसेच शैक्षणिक संकुले यामुळे नित्यनियमाची वाहतूक कोंडी होत आहे. अक्षरशा 1 किमीच्या अंतरासाठी वाहतूक कोंडीमुळे 1 ते 2 तास एवढा अवधी लागत आहे. त्यामुळे सर्व नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. ही समस्या सोडविण्याकामी मंजूर असलेल्या बाह्यवळण रस्ते व जोड रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु करण्याची आवश्यकता आहे, बाह्यवळण जोड रस्त्याची कामे झाली तर वाघोलीमधील वाहतुकीची कोंडीची समस्या सुटण्यास मोठा हातभार लागेल.
पाणी समस्या…
गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दीड वर्षापूर्वी वाघोलीचा महानगरपालिकेत समावेश झाला त्यावेळी गावाचा महसूल 23 कोटी होता. आत्ता सुमारे 50 कोटी असा आहे. वाघोलीसाठी सद्यपरिस्थितीला 35 एमएलडी पाण्याची गरज आहे; परंतु आज सुद्धा ग्रामीण जि. प. माध्यमातून झालेल्या पाणी पुरवठा योजनेतून 5 एमएलडी एवढाच पाणी पुरवठा होतो. नुकतीच पीएमआरडीएमधून 22.68 कोटी रु. ची नवीन 5 एमएलडी पाणीपुरवठा होणाऱ्या लाइनचे काम प्रगतीपथावर आहे; परंतु काम पूर्ण होण्यास 5 ते 6 महिने कालावधी लागेल. भामा आसखेड पाणी योजनेतून नुकतेच लोहगाव वाघोली साठी 230 कोटी रुपये मंजूर होऊन टेंडर प्रक्रिया झालेली आहे. त्यामध्ये पाण्याची टाकी व पाइपलाइन तसेच पंपींग स्टेशनचे काम होणार आहे; परंतु त्यासाठी 2 ते 3 वर्ष कालावधी लागणार आहे.





