पुणे जिल्हा : पराभवाची कारणे शोधून सुधारणा करू : दिलीप वळसे-पाटील

मंचर – लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे विजय झाले. अजित पवारांसह आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्याचं चिंतन आम्ही नक्कीच करू व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यामध्ये नक्कीच सुधारणा करू, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मंचर येथे संपन्न झाली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न होते जातीपातीचे राजकारण समोर मांडले मांडू शकलो नाही. वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. त्याचा परिणाम मतांवर झाला.
उदाहरण द्यायचं झालं तर आदिवासी भागामध्ये घटना बदलणार, असे सर्वांना सांगण्यात आले होते. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या आदिवासी समाजाचा आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाचे आरक्षण कोण काढायला निघाले आहे. तसेच एसटीचा आरक्षण काढायला कोण निघाले, हे फक्त निवडणुकीपुरते फसवेगिरीचे मुद्दे होते, जे समोरच्या पार्टीने प्रभावीपणे मांडले ते आमच्याकडून प्रभावीपणे मांडले गेले नाहीत.
विधनसभेबाबत सांगता येणार नाही
विधानसभेबाबत सध्या तरी मला सांगता येणार नाही. मात्र, कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही याचा अधिकार वरिष्ठ नेत्यांना असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. उद्या दिल्लीतल्या सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील बैठक घेणार असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले आहे. आठ दिवस प्रत्येकाने आपल्या मतदारसंघाचे चिंतन करून मुद्दे मांडायचे आहेत त्यानंतर पुढील रणनीती ठरवणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.





