पुणे जिल्हा : निमगावातील पाण्याचे स्त्रोत कंपन्यांमुळे दूषित

जबाबदारी घेऊन एमआयडीसीने पाणीपुरवठा करावा -सरपंच इचके
रांजणगाव गणपती – निमगाव भोगी (ता. शिरुर) या गावात महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लि. कंपनीकडून दूषित पाणी सोडल्यामुळे पाण्याचे सर्व स्त्रोत दूषित झाले असून पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी रांजणगाव औद्योगिक विभागाने त्वरीत पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी सरपंच उज्वला अंकुश इचके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतून वाहणार्या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे व वापरण्याच्या पिण्याचे स्ञोत खराब झाले आहेत. त्यामुळे पाणी देणेबाबत औद्योगिक विकास महामंडळाने शब्द दिला होता परंतु पाणी दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याचा पाण्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
तरी एमआयडीसीकडून रोज पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कारण या दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना विविध शारिरीक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक जनावरेही दूषित पाणी पिऊन दगावल्याने निमगाव भोगी येथील पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सरपंच उज्वला अंकुश इचके यांनी सांगितले.





