Pune District : जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन करावे

– यशदाचे प्रशिक्षक सूर्यकांत शिवले यांचे आवाहन
लाखणगाव – केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना सुरू आहे.या योजनेच्या माध्यमातून पाणीस्रोतांचे बळकटीकरण करुन वर्षभर पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले पाहिजे. असे आवाहन यशदाचे प्रशिक्षक सूर्यकांत शिवले यांनी केले.
पारगाव शिंगवे (ता.आंबेगाव) या ठिकाणी जनजीवन मिशन योजनेचा टप्पा क्रमांक ४ च्या संदर्भात दोन दिवस प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी यशदाचे प्रशिक्षक सूर्यकांत शिवले बोलत होते. यावेळी काठापूरचे सरपंच अशोक करंडे, पारगावच्या सरपंच श्वेता ढोबळे, जवळेच्या सरपंच वृषाली शिंदे, यांसह परिसरातील गावांमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती आंबेगाव यांच्या माध्यमातून, साईप्रेम ग्रामीण विकास संस्था यवतमाळ यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. दोन दिवस या शिबिराच्या माध्यमातून जलस्रोतांचे बळकटीकरण व शाश्वतीकरण, वर्षभर ३६५ दिवस पाणी पुरेल यासंदर्भात नियोजन,
पावसाचे पडणारे पाणी अडवणे ते जमिनीत जिरवणे, जमिनीतील पाणी पातळी कशी वाढवायची,पाण्याचे काटकसरीने वापर कसा केला पाहिजे. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक रविराज पाटील, जयदेव साळवे यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवस प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे समन्वय प्रणिता भालेकर, सचिन कुचेकर यांनी केले.





