पुणे जिल्हा : वाळुंजवाडीच्या तरुणांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील वाळुंजवाडी गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेला भोंगळ कारभार आणि कामकाजाची चौकशी व्हावी या मागणीसाठी वाळुंजवाडी येथील नितीन गणपत वाळुंज व निलेश निवृत्ती लोंढे हे दोन तरुण सोमवार, दि. १ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषणास बसले आहेत. याबाबत चौकशी व्हावी, असे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.
निवेदनात, गावचे सरपंच नवनाथ चिंतामण वाळुंज, ग्रामसेवक सचिन आत्माराम नवले, वनविभागाचे अधिकारी, यांच्यावर विविध आरोप केले असून गावचे पोलीस पाटील सागर कोंडीभाऊ वाळूंज यांना पदमुक्त करण्याची मागणीही केली आहे. ग्रामसेवक यांनी बनावट निविदाद्वारे कामे देउन बनावट बिले बनवले आहे. गावातील गटार योजना निकृष्ट दर्जाची झाली आहे.
मनरेगा योजनेअंतर्गत गावात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बनावट सह्यांच्या आधारे शिपाई भरती झाली आहे. तिची चौकशी करावी, कचराकुंड्या खरेदीसाठी बोगस निविदा व वाढीव दराने खरेदी केले आहेत. सन २०२० पासून ग्रामपंचायतीचा ऑडिट रिपोर्ट न बनवणाऱ्यांवर कारवाई करावी, दुसऱ्या गावच्या ग्रामपंचायतची बिले वाळुंजवाडी ग्रामपंचायतमधून दिली गेली आहेत.
संगणक खरेदी घोटाळ्यातील बनावट निविदा धारकांवर कारवाई व्हावी, गावात मनरेगा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी व्हावी, तसेच गावचे सरपंच नवनाथ वाळूज व मंचर विभागाचे वनपाल संभाजी गायकवाड, पूजा कांबळे यांनी ऑगस्ट २०२३ या महिन्यात मेंढपाळ शिवाजी बरकड, मेंढपाळ दत्ता लवाटे यांना शासकीय वनचराई करण्यास प्रवृत्त करून सरपंच व वलपाल यांनी त्यांच्याकडून दहा हजार रुपयांची खंडणी घेतला असल्याचा आरोपही या तरुणांनी केला आहे.





