– अतीवृष्टीचा फटका; इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर धान्याचे मोठे नुकसान भोर – भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसात पश्चिम भागातील आठ वेगवेगळ्या गावातील एकूण आठ घरांच्या भिंती गेल्या दोन दिवसात कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, भाटघर धरण जलाशय भागातील नऱ्हे (ता.भोर) येथे एकाच रात्रीत दोन ठिकाणच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. यामध्ये शेतकरी पांडुरंग नामदेव वीर (अशोक नगर) यांच्या राहत्या घराची भिंत बुधवारी (ता.२४) रात्री सव्वा अकराच्या दरम्यान कोसळली. शेतकरी वीर व घरातील सहा जण झोपेत असताना भिंत कोसळली. सुदैवाने भिंत बाहेरच्या बाजूला पडल्याने अनर्थ टळला. मात्र, भिंतीबरोबर घरावरील कौलेही पडल्याने पावसाच्या पाण्याने धान्य, टिव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच भिंतीशेजारी लावलेली दुचाकीवर भिंतीचे दगड पडल्याने दुचाकीचेही नुकसान झाले आहे. तर रवींद्र सोनबा वीर यांच्या गोठ्याची भिंतही त्याच रात्री कोसळली आहे. यातही जीवित हानी झाली नाही. मात्र, पावसाचे पाणी गोठ्यात येत असल्याने जनावरे भिजत आहेत. या दोन्ही घटनांबाबत सरपंच हनुमंत वीर व पोलीस पाटील अजय वीर यांनी प्रशासनाला कळवले असता प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येणार असल्याचे सांगितले. याच बरोबर महुडे बुद्रुक येथील बबन धोंडीबा आखाडे (आखाडे वस्ती), पांगारी नानावळे (शिंदेवाडी) येथील फुलाबाई बाबू शिंदे, बुरुडमाळ येथील भागाबाई रामचंद्र आखाडे, खुलशी येथील लक्ष्मण तुकाराम ढेबे व संतोष भिका शिंदे, साळव भांबटमाळ येथील नथुराम धोंडिबा साळेकर व बाबाजी धोंडिबा साळेकर, कुडली बुद्रुख येथील राहिबाई दगडू कंक व तुकाराम कंक यांच्या घरांच्या भिंती दोन दिवसात झालेल्या पावसात पडल्या आहेत. तर करंजगाव येथील शांताबाई सुदाम गायकवाड यांच्या बंद असलेल्या घरकुलाची भिंत पडली आहे. बैल वाहून गेला… याशिवाय धानवली येथील मारुती कोंडीबा धानवले यांचा बैल ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. तर कुडली बुद्रुक येथील रघुनाथ लक्ष्मण कंक यांची शेताची ताल पडली असुन पिकाचे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाकडून या पडझडीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.