पुणे जिल्हा : पूर्व हवेलीतील गावांचे मतदान निर्णायक

आश्वासनांच्या हिंदोळ्यावर अनेक प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेलेच
लोणी काळभोर – पुणे शहरालगत असलेल्या हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावे आजही विकासाच्या हिंदोळ्यावर लोंबकळत आहेत. 1985पासून पूर्व हवेलीतील ही गावे पुरंदर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली होती. 25 वर्षांनंतर 2009 साली हिच गावे शिरूर – हवेली मतदारसंघाला जोडण्यात आली. चुरशीच्या निवडणुकीत हवेलीतील ही गावे आतापर्यंत निर्णायक ठरली आहेत; मात्र या गावांतील सुविधा, प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांच्या भुलभैलय्यात मतदारांना झुलविले जात आहे. पायाभूत सुविधा, शाश्वत विकासाच्या नावाने बाराही महिने शिमगाच होत आहे.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, वाघोली, उरूळी कांचन, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी, थेऊर, कुंजीरवाडी, तरडे, आळंदी म्हातोबाची, खामगाव टेक, प्रयागधाम, कोरेगाव मूळ, भवरापूर, शिंदवणे, वळती, कोलवडी, केसनंद, लोणीकंद, अष्टापूर, पेरणे, डोंगरगाव, नायगाव, पेठ आदी 38 गावे ही 1985मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पुरंदर विधानसभेला जोडण्यात आली.
पुरंदर विधानसभा मतदारसंघात 1985मधील निवडणुकीत दादा जाधवराव यांनी 19,204 मतांनी काँग्रेसच्या हरिश्चंद्र सस्ते यांचा पराभव केला होता. 1990 मध्ये दादा जाधवराव यांनी काँग्रेसचे विजय कोलते यांचा पराभव केला. 1995 व 1999 मध्येही जाधवराव यांनी विजय खेचून आणला. या चार निवडणुकीत जाधवराव यांचे मताधिक्य हळूहळू कमी होत गेले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक टेकवडे यांनी दादा जाधवराव यांचा पराभव करून विजयरथ रोखला. हवेली तालुक्यातील 38 गावे या सर्व निवडणुकीत निर्णायक ठरत होती.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 च्या निवडणुकीत पुरंदरमधील समाविष्ट 38 गावे ही शिरूर विधानसभा मतदारसंघात जोडल्यामुळे पुरंदरला जोडलेला लंबक शिरूरकडे सरकला. गेली अनेक वर्षे हवेलीतील 38 गावे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. शहराला खेटून असलेल्या गावांत भौतिक सुविधा आल्या. त्यात नागरिकीकरणाचा वेग वाढल्यामुळे या गावांची सूज वाढली. मात्र, पायाभूत सुविधांचा वानवाच आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अनेक गावे विकासकामांपासून कोसो दूर आहेत.
लोणी काळभोर, वाघोली, उरूळी कांचन, लोणीकंद ही गावे विजयी उमेदवाराच्या मताधिक्यांसाठी आतापर्यंत निर्णायक ठरली आहेत. तरीही ग्रामपंचायतींना निधी तोकडा पडत असल्यामुळे विकासकामांवर मर्यादा पडत आहेत. त्यात लोकप्रतिनिधींकडून भरीव निधी मिळाला तर या गावांचा प्रश्न सुटणार आहे. परंतु अद्याप अनेक गावे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.
2000 सालानंतर हवेली तालुक्यातील 38 गावांमध्ये नागरीकरण वाढल्यामुळे आर्थिक सुबत्ता वाढली. त्यामुळे अनेक गावांमध्ये भौतिक सुविधा निर्माण झाल्या. त्याचबरोबर 2004 मध्ये पुुणे सोलापूर आणि पुणे अहिल्यानगर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील समस्या आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आजतागायत कोणत्याही कारभार्याला सोडविता आली नाही. दररोज स्थानिक नागरिक आणि चाकरमान्यांना मरणकळा सोसाव्या लागत आहे.
यशवंत कारखान्याचा प्रश्न सुटेना
शेतकर्यांची जीवनवाहिनी आणि राज्यकर्त्यांसाठी सोन्याची कोंबडी असलेल्या यशवंत साखर कारखान्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून लोंबकळत पडला आहे. पुरंदर तालुक्यातून बाहेर पडल्यानंतर ही गावे शिरूरला जोडली. त्यानंतर कारभारी बदलत गेले. परंतु 2011 नंतर यशवंत कारखान्या वरून विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी, पदाधिकार्यांनी जाहीरपणे आणाभाका घेतल्या, आश्वासने दिली; मात्र अजूनही शेतकर्यांना झुलवतच ठेवले आहे. त्यामुळे सोन्याची जमीन असलेला हा कारखाना कोणालाही चालविण्यात आणि सुरू करण्यात स्वारस्य नाही हेच दिसून येत आहे.
ठळक मुद्दे-
लोणी स्टेशन, थेऊर फाटा, उरूळी कांचन, वाघोली, लोणीकंद येथे उड्डाणपुलांची गरज
पिण्याच्या पाण्यासाठी पायाभूत सुविधा गरजेची
जुन्या कालव्यातून पाणी उचलण्याची परवानगीची प्रतीक्षा
ऊस उत्पादकांसाठी न्याय देण्याची अपेक्षा





