मंचर : आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक कार्यकारिणी सभेत तहसील कार्यालय आंबेगाव स्वीप पथकाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आल्याची माहिती आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके यांनी दिली. 196 आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय नागटिळक, निवडणूक नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा2024 निवडणुकीत 60टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आदिवासी, शहरी, ग्रामीण भागातील वाडी – वस्तीवर विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत शरदचंद्र पवार सभागृह मंचर येथे तहसील कार्यालय आंबेगाव स्वीप पथकाच्या वतीने आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत जाऊन मतदार जनजागृती करण्यात आली. आंबेगाव विधानसभा मतदार संघात युवा, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात सुविधांची माहिती देण्यात आली व आंबेगाव विधानसभा स्वीप पथकाच्या वतीने येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आणि त्या आवाहनाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सोडून सारे कामधाम मतदान करणे आपले पहिले काम असा नारा देवून मतदानाचा संकल्प त्यांच्या वतीने करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष दशरथ भालेराव व उपाध्यक्ष ए. एफ. इनामदार, विविध गावचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. उपस्थित 75 पदाधिकार्यांकडून मतदान संकल्प पत्र भरुन घेण्यात आली. तसेच त्यांना मतदान संकल्प शपथ देण्यात आली. यावेळी मतदार जनजागृती पथकाचे नोडल अधिकारी सुनिल भेके सदस्य विनायक राऊत, सचिन तोडकर, काशिनाथ घोंगडे, तुषार शिंदे, राहुल रहाटाडे, नारायण गोरे, सुरेश रोंगटे, मंगेश जावळे, अशोक लोखंडे उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात 85 वर्षांपुढील मतदारांची संख्या अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. -सुनील भेके, स्वीप नोडल अधिकारी आंबेगाव.