पुणे जिल्हा : बळीराजाच्या आनंदावर विरजण

पावसाने मारली दडी : खरीप हंगाम लांबण्याची चिन्हे
समीर भुजबळ
वाल्हे – मागील काही दिवसांपासून ढगाळ वातारण आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे मान्सूनपूर्व नियोजन करत रानांची नांगरणी केली; मात्र मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने रानातील मातीची ढेकळे तशीच आहेत. पावसाने अजून विलंब केल्यास खरीपातील पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. इतर मशागतीची कामेही लांबणीवर पडू शकतात.
वाल्हे (ता.पुरंदर) परिसरात शेतकरीवर्गाने शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून, पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. एप्रिल-मे महिन्यातच मान्सूनपूर्व पाऊस पडत असतो. या पावसाने शेतकरीवर्गाला फायदा, तोटा दोन्हींही होत असतो. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस वाल्हे परिसरात बरसलाच नाही. एप्रिल, मे महिन्यात अतिउष्णतेचा सामना करावा लागला असतानाच, जून महिन्यातही उन्हाची तीव्रता “जैसे थे’ आहे.
मागील दोन वर्षांत बळीराजाला निसर्गाने चांगली साथ दिली, त्यात आजतागायत या भागात पाण्याची पातळी बऱ्यापैकी टिकून राहण्यास मदत झाली. मागील वर्षी पाऊस वेळेवर पडला, तसेच अतिवृष्टीचा फटकाही शेतकरीवर्गाला बसला. त्यात अनेक पिके मातीमोल झाली. तरीही बळीराजा डगमगला नाही. कारण, खरीप हंगाम वाया गेला, तरी रब्बी हंगामातील पिकांना पाणीपातळीत वाढ झाल्याने फायदा होईल, ही आशा बाळगून शेती व्यवसाय करण्यावर भर दिला होता.
काळे ढग जमतात, पण…
गेल्या काही वर्षांत पावसाची अनियमितता व दुबार पेरणी संकट या गोष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे; परंतु मागील दोन वर्षांत चांगले पर्जन्यमान झाल्याने, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र यंदा पावसाने बळीराजाच्या आनंदावर पूर्णपणे विरजण घातले असून विहिरी व बोअरवेलने तळ गाठले आहे. त्यात उन्हाळ्याची तीव्रता कायम असल्याने परिसरातील शेतीतील ऊस, फळबाग व पशुसंवर्धनाचा चारा, पिकांची तहान अजून वाढली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. आता बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गेल्या दोन – तीन दिवसांपासून आकाशात काळे ढग जमतात, पण पाऊस पडत नाही.
दुसरा आठवडा संपला तरी…
पाऊस पडेल या आशेवर शेतकरीवर्ग असून, मान्सूनपूर्व तयारी म्हणून शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते आदी साहित्याची खरेदी केली आहे. जूनचा दुसरा आठवडाही संपत आला असून, हवेत अजूनही उकाडा जाणवत आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगांचाही परिसर पाऊसाविना उजाड जाणवत आहे. निसर्ग राजीदेखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे.





