Pune District : ग्राम सुरक्षा यंत्रणा मजबूत होणार

शिरूरच्या बैठकीत सीसीटिव्ही, सुरक्षेला बळकटी
शिरूर – शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात येत आहे. गावाच्या प्रवेशद्वार, मुख्य रस्ते, शाळा, बाजारपेठा आणि संवेदनशील भागांत सीसीटिव्ही बसवून त्याद्वारे नियंत्रण ठेवावे. सुरक्षा दल व यंत्रणांना बळकटी द्यावी, असा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
शिरूर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांचा संयुक्त सहभाग हाच सुरक्षित गावांचे मूळ सूत्र असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी बैठकीत महत्त्वाचे मुद्दे मांडले. यावेळी सूचना देण्यात आल्या. सद्यस्थितीत वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी, यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा व दल अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. बैठकीस पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच स्थानिक स्तरावर याची अमंलबजावणी करणार असल्याचे संकेत दिले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे सर्व प्रतिनिधींनी ग्राम सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याचे निश्चित करत पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.
गावच्या प्रवेशव्दारावर नियंत्रण ठेवा
यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणा तात्काळ सुरू करावी, प्रत्येक गावाने आपल्या पातळीवर ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून चोख नियंत्रण ठेवावे, असे आवाहन केले. गावांमध्ये अस्तित्वातील सुरक्षा दलांना रात्री गस्तीसाठी पुन्हा सक्रीय करावे, त्यासाठी योग्य नियोजन व जबाबदारी द्यावी, गावाच्या प्रवेशद्वार, मुख्य रस्ते, शाळा, बाजारपेठा आणि संवेदनशील भागांत सीसीटिव्ही बसवून त्याद्वारे नियंत्रण ठेवावे. सुरक्षा दल व यंत्रणांना बळकटी द्यावी, असे ठरले.





