Pune District : महाराष्ट्र राज्य ग्रंथालयाच्या उपाध्यक्षपदी विजय कोलते

वाघापूर : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची निवडणूक शेगाव (बुलढाणा) येथे नुकतीच पार पडली. निवडणुकीत डॉ. गजानन कोटेवार (वर्धा) यांची बहुमताने निवड झाली. पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी केली.
राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाने नियमावली नव्याने केली असून त्यानुसार विभाग ग्रंथालय संघाच्या अध्यक्षांना राज्याच्या संघावर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. विजय कोलते हे पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष असल्याने त्यांची राज्य संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. कोलते यांच्या निवडीबद्दल सासवड येथे आचार्य अत्रे सभागृहात पुरंदर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नामदेव झुरंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्रीहरी कोतवाल, रमेश कोतवाल, ऍड अण्णा खाडे, ऍड दिलीप निरगुडे, शशिकला कोलते, कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवले, बंडूकाका जगताप, सुरेश कोडीतकर यांच्यासह पुरंदर तालुका ग्रंथालय संघ आणि आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे कार्यवाहक बाळासाहेब मुळीक यांनी प्रास्ताविक केले. नितीन यादव यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. धनाजी नागणे, माजी मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, रामचंद्र खेडेकर, संदीप टिळेकर उपस्थित होते.





