पुणे जिल्हा : विघ्नहर बाजारभावात कमी पडणार नाही

ऊसत्पादकांना अध्यक्ष शेरकर यांची बेल्हे येथे ग्वाही
ओझर – आपल्या कार्यक्षत्रात आडसाली ऊसाची लागवड मोठ्याप्रमाणात होते. व तुलनेने पूर्वहंगामी व सुरू उसाची लागवड कमी होते. यापुढे शेतर्यांनी पूर्व हंगामी व सुरू उसाची लागवड करुन तुटणार्या उसाचा खोडवा ठेवण्यास प्राधान्य द्यावे. तसेच आपला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना ऊस बाजारभावत कमी पडणार नाही, अशी ग्वाही अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
बेल्हे (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (दि. 16) विघ्नहर कारखान्याच्यावतीन ऊस विकास परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यावेळी शेरकर बोलत होते. यावेळी कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे माजी किटक शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते, हवामान अभ्यासक पंजाबराव डक, विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे, मुख्य शेतकी अधिकारी सचिन पाटील, ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शेरकर म्हणाले की, एकरी 100 टनापेक्षा जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणारे शेतकरी आपल्या कार्यक्षेत्रातीलच आहेत. तर पिकांना हमीभाव नसल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शाश्वत हमीभाव असलेल्या ऊस पिकाची मोठ्याप्रमाणात लागवड करून त्याची नोंद करावी व ऊस गाळपास द्यावा.
उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी विघ्नहरच्या शेतकी विभागामार्फत अनेक ऊस विकास योजना राबविल्या जातात व शेतकर्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन केले जाते. पठार भागासाठी कमी पाण्यावर व पाण्याचा ताण सहन करणार्या ऊस वाणाची माहिती घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकी अधिकारी संदीप जाधव यांनी तर उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.
भुंगेरे गोळा करणे उत्कृष्ट
विघ्नहर मार्फत राबवित असणार्या एकात्मिक हुमणी किड नियंत्रण भुंगेरे गोळा करण्याच्या मोहिमे उत्कृष्ट आहे. 2003 पासून आजपर्यंत सुरू असलेल्या विघ्नहरच्या भुंगेरे गोळा करण्याच्या मोहिमेचा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आदर्श घ्यावा. तसेच हुमणी किड नियंत्रणाकरीता विविध उपाय योजना डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितल्या.
यंदाच्या हंगामात जुन्नर तालुक्यात भरपूर पाऊस पडणार असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात होणार आहे. साधारणतः जुलै तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये जोरदार पाऊस होवून परिसरातील धरणे पूर्ण क्षमतेने भरणार आहेे.
– पंजाबराव डक, हवामान अभ्यासक





