पुणे जिल्हा : पालखीतील वाहनांना, वैष्णवांना अडथळा नको

माऊली मंदिराच्या पदाधिकार्यांच्या सूचना : वाल्हे पालखी तळाला दिली भेट
वाल्हे – पालखी तळावर माऊलींचा रथ विसावा ओट्याच्या बाजूला असतो; तिथपर्यंत पक्का रस्ता त्वरित करावा; रत्याच्या बाजूलाच लागणारी दुकाने रस्त्यापासून लांब मागे लावावीत. जेणेकरून सोहळ्यातील वाहनांना तसेच पायी चालणा-या वैष्णवांना अडथळा येणार नाही. पालखी महामार्गाचे अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांच्या ठिकाणी दिशादर्शक, मार्गदर्शनपर फलक लावण्यात यावेत, अशी सूचना संबंधित महामार्ग प्राधिकरण व पोलीस प्रशासनाला माऊली मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या आद्यरामायणकारांच्या वाल्हे नगरीत (ता. पुरंदर) पालखी सोहळ्याचे आगमन शुक्रवार (दि.5) जुलै होत आहे. सोहळ्याच्या तयारीची पाहणी पालखी सोहळ्याचे बाळासाहेब चोपदार यांच्या नेतृत्वाखाली, प्रशासकीय अधिकार्यांनी गुरुवारी (दि. 13) केली, त्यावेळी वरील सूचना करण्यात आल्या.
याप्रसंगी, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, जेजुरी पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे, वाल्हे सरपंच अतुल गायकवाड, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उमेश बागडे, उपसरपंच अमित पवार, सागर भुजबळ, हनुमंत पवार, मंडल अधिकारी भारत भिसे, तलाठी सतीश उमाप, ग्रामसेवक राजाराम शेंडगे, कोतवाल आनंद पवार, पालखी महामार्गाचे अधिकारी सिद्धांत अवधूत, नितीन गावडे आदींसह अनेक अधिकारीवर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.
सोहळ्यातील प्रमख गाड्यांसाठी यंदा विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या वाहनांचे क्रमांक पोलिसांना दिल्यास त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल.
– तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,





