पुणे जिल्हा : ‘जलजीवन’च्या कामांत दर्जेदार रस्त्यावर ‘वरवंटा’

शिरूर तालुक्यात चित्र : शेकडो वृक्षांची कत्तल
शिरूर – शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पाइपलाइन टाकली जात आहे. रस्त्याच्या कडेने जेसीबीच्या सहाय्याने ही पाइपलाइन टाकली जात असून यासाठी शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे.
सामाजिक वनीकरण विभागाने शिरुर तालुक्यात गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा मोठी वृक्ष लावगड केली आहे. परंतू या पाइपलाइनमुळे अनेक झाडे तोडली असून वन विभागाने सामाजिक वनीकरण विभागाने पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशन योजनेतून करोडो रूपयांची कामे शिरूर तालुक्यात सुरू आहेत. मात्र, सुरुवातीपासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.
अनेक गावात ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. गावातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची या योजनेने अक्षरशः वाट लावली आहे. त्यामुळे हे रस्ते व झाडे तोड मिशन आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे..जलजीवन मिशन हे कधी जागेच्या वादात, कधी रस्त्यांच्या वादात, कधी निकृष्ट कामाच्या वादात, तर कधी गावात निघालेल्या गौण खनिज गुपचूप विक्रीच्या वादात सापडत आहे.
त्यामुळे ही योजना नेमकी लोकांच्या फायद्याची की गावच्या तोट्याची असाही प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. कवठे, सविंदणे, आमदाबाद, निमगाव दुडे, गावात तर अनेक ठिकाणी नवीन झालेले पक्के डांबरी रस्ते ठेकेदारांनी तोडून फोडून टाकले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
संगनमतातून कामाचा दर्जा ठरतोय
सध्या जलजीवन मिशनचे पाइप रस्ते उकरून टाकण्याच्या व बिले काढण्याच्या कामात ठेकेदार व्यस्त आहेत. ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने कामाचा दर्जा ठरत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून उमटत आहेत. ग्रामसभेत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन योजनेविषयी, पाइप टाकण्याची खोली किती याची अधिकारी वा ठेकेदाराने सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यामुळे योजनेवर भविष्यात होणारा खर्च ग्रामस्थांना किती फायदा मिळवून देणार, याबाबत चित्र अस्पष्ट आहे.





