पुणे जिल्हा : कोंढरी, धानवलीसह हिरडस मावळ खोऱ्यातील विविध विकास कामे मार्गी

-आमदार संग्राम थोपटे यांची ग्वाही
भोर – कोंढरी, धानवलीसह हिरडस मावळ खोऱ्यातील विविध विकास कामे मार्गी लावली, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे काॅंग्रसेचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी केले. भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील मतदार बंधू-भगिनींची गांवा भेट दौऱ्यात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, अनेक वेळा पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे वरंधा घाट दरड कोसळून वाहतुकीस बंद होत असल्याने जनजीवन विस्कळीत व्हायचे. परंतु यासाठी केलेल्या पाठपुराव्याने आता महाड-पंढरपूर रस्त्याचे काँक्रिटिकारण करणे व अनेक ठिकाणी संरक्षण भिंती बांधणे हे काम तब्ब्ल ७२३ कोटी रुपये खर्चाच्या निधीतून आता सुरू झाले आहे, रस्ता वाहतुकीस उत्तम दर्जेदार होणार आहे त्यामुळे प्रवाशी व नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
दुर्गम डोंगरी असलेल्या या भागात शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय पाहता या भागातील तरुण व ग्रामस्थ यांनी केलेल्या मागणीनुसार रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून शिरवली हि.मा.येथे माध्यमिक विद्यालय सुरू केले आहे, त्यामुळे येथील विशेष करून मुलींच्या शिक्षणाला अधीकचा वाव मिळाला आहे.
कोंढरी, धानवली व मुळशी तालुक्यातील घुटके या गावाचे पुनर्वसन तात्काळ व्हावे यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या समवेत अनेक बैठका घेतल्या. विधानसभेच्या अधिवेशनात यासंदर्भात आवाज ही उठवला त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री कार्यालयात असून पुढील काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याने तोही प्रश्न मार्गी लागेल.
रायरेश्वर किल्ल्यावर येण्या-जाण्यासाठी लोखंडी शिडी बसवण्याचे काम मार्गी लावता आल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले. तसेच माझेरी, परखंदेवाडी, करंजगाव, गोळेवाडी, म्हसर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी विशेष लक्ष घालून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे.
त्याचबरोबर अनेक गावात, वाडीवस्तीत पाणीपुरवठा योजना, सभामंडप, रस्ते काँक्रीटकरण, शाळा इमारत, स्मशानभूमी अशी अनेक विकास कामे मार्गी लावता आली.
त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात या भागासह तालुक्याचा विकास अधीक गतीने करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. त्यासाठी हिरडस मावळ भागातील सर्व जनतेचे सहकार्य, पाठबळ माझ्या पाठीशी आहे यांचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मानसिंग धुमाळ, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, विठ्ठल आवाळे, हनुमंत कंक, आनंदा आंबवले, अनिल सावले, रामदास जेधे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
भाजप कार्यकर्त्यांचा काॅंग्रेसप्रवेश….
भोर-राजगड-मुळशी तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन व विकासकामांचा धडाका पाहून कुंडली बुद्रुक येथील भोर तालुका भाजप संयोजक शिवाजी कंक, लहू कंक, अजित कंक, गोविंदा कंक, श्रीपत कंक, नवनाथ कंक, बळी कंक व सिद्धिविनायक मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार थोपटे यांनी सर्वांचे सत्कार व अभिनंदन करून पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





