Pune District : वनपुरीवासीय आक्रमक; सिटी सर्व्हेचा कॅम्पच रद्द

ग्रामपंचायत, भूमी अभिलेख विभागाकडून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप
दिवे – वनपुरी (ता. पुरंदर) गावामध्ये 2022-23 मध्ये ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाने सनद तयार करताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत. अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांची घरे बांधलेली असताना त्याची नोंद न करता ग्रामपंचायत असे दाखविण्यात आले आहे. काही ठिकाणी मोकळ्या असताना तिथे ग्रामपंचायत सदरी नोंद करण्याऐवजी ठराविक राजकीय लोकांची जाणीवपूर्वक नोंद केलेली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने तात्पुरती दुरुस्ती न करता नव्याने सर्व्हे करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून ग्रामस्थांच्या आक्रमतेमुळे बुधवारी (दि. 23) प्रशासनाने सिटी सर्व्हेचा कॅम्पच रद्द केला आहे.
वनपुरी येथील गावठाणमधील सर्व्हेबाबत मोठ्या प्रमाणात चुका असून ग्रामपंचायत व भूमी अभिलेख विभागाकडून लोकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करून नागरिकांनी गावचा सव्हेर्र् नव्याने करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी वेळोवेळी भूमी अभिलेख विभागाकडे पुराव्यासह मागणी केली आहे. मागील दोन वर्षापासून तालुका भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय, आमदार विजय शिवतारे यांना वेळोवेळी निवेदने देवून सर्व्हे करण्याची मागणी केली होती.
याची दखल घेवून भूमी अभिलेख विभागाने बुधवारी (दि. 23) वनपुरीमध्ये कॅम्प आयोजित केला होता. भूमी अभिलेख विभागाचे शिरस्तदार संजय पवार, परिरक्षण भूमापक विकास ढेकळे, भुकरमापक विष्णू सोनटक्के, दप्तरबंद राजेंद्र चिंचकर आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी लेखी स्वरुपात द्याव्यात त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील असे सांगितले. त्यावर आम्हाला तात्पुरत्या दुरुस्ती नकोत तर पुन्हा नव्याने सर्व्हे करून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली.
पदाधिकार्यांकडून पदांचा गैरवापर?
दोन दिवसांपूर्वीच तालुका भूमी अभिलेख विभागाला ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे. यामध्ये अनेक पदाधिकार्यांनी पदांचा गैरवापर करून गावठाणमधील मोकळ्या जागा स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर करून घेतल्या असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्याविरोधात जाहीरपणे तक्रारी करण्यास नागरिक भीत आहेत. काही नागरिकांच्या घरावर ग्रामपंचायत अशा नोंदी केल्या आहेत. त्यामुळे तात्पुरता कॅम्प न घेता पूर्वी केलेला सर्व्हे रद्द करावा आणि नव्याने पुन्हा सर्व्हे करावा अशी मागणी केली आहे.
नव्याने करण्यात येणारी सनद यावर घ्यावे
सर्व्हे करताना ग्रामपंचायत मधील 8 – अ वर जेवढे क्षेत्र असेल तेच क्षेत्र गावचा नकाशा तसेच नव्याने करण्यात येणारी सनद यावर घ्यावे. तसेच अनेक लोकांनी 8 – अ वर नव्याने चुकीच्या नोंदी केल्या असल्याची शंका असून वर्ष 2000 पूर्वी 8 – अ वरील क्षेत्रा प्रमाणेच नोंदी कराव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीनुसार भूमी अभिलेख विभागाने गावचे उपसरपंच सुजित कुंभारकर, सदस्य हरिश्चंद्र राऊत आणि प्रताप कुंभारकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करून कॅम्प रद्द केल्याचे सांगितले.





