पुणे जिल्हा : वाळद-सुरकुंडी-चिखलगाव रस्ता खड्ड्यांत

लोकनियुक्त सरपंचांसह ग्रामस्थांची मागणी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारा भीमा-वाळद (ता. खेड) येथील वाळद-सुरकुंडी-चिखलगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
चास कमान धरणात पाणीसाठा सुरू झाल्याने खेड पश्चिम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील पश्चिम भागाचे दोन भाग झाले पाणीसाठ्यामुळे जवळपास 25 पेक्षा गावांचा संपर्क तुटला होता. दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. 25 पेक्षा जास्त गावांचा दळणवळणाचा प्रश्न लक्षात घेत आमदार दिलीप मोहिते यांच्या पाठपुराव्याने धरणांतर्गत पायलट पुलाला मंजुरी मिळवली. पुलाचे काम मार्गी लागले पायलट पूल झाला मात्र रस्त्या मजबूत झाला नाही त्यामुळे वर्दळीच्या या उपलब्ध रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, रस्त्यात पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे मोठी कसरत करावी लागत आहे.
वाळद-सुरकुंडी चिखलगाव हा रस्ता वाळद गावातून जातो. या रस्त्यावर निधी न पडल्याने गेली अनेक वर्षे हा रस्ता रखडला आहे. त्यातच राजकारण होत असल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. उपलब्ध रस्त्यात मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यातून वाहने चालवणे जिकरीचे झाले असून अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमध्ये पडले आहेत.
मागील चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते; मात्र आता त्यावर मोठे आणि खोल खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पुढील 25 ते 30 गावातील दळणवळण अवलंबून आहे. पायलट पुलावरून जड अवजड वाहने जा-ये करतात त्यामुळे आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यात खड्डे पडून त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ दुरुस्त करावेत. पुढील काळात हा रस्ता काँक्रीटीकरण करावा, अशी मागणी पोखरकर यांनी केली आहे.





