Pune District : विठुरायाच्या गजरात वैष्णव तल्लीन ; विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी

पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
तळेगाव ढमढेरे – आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या मंदिराला ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भक्तिमय वातावरणात भाविक पांडुरंगाच्या चरणी लीन झाले.
जे वारकरी विविध कारणांमुळे पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, त्यांनी आपल्या गावातील मंदिरांमध्ये पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे, विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मंदिराच्या बाहेरही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिराला सुंदर फुलांनी सजावट करण्यात आली होती. गर्दीमुळे आषाढी एकादशीचा उत्साह विठ्ठलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून आला.
पहाटे मंदिरात शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके व शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते अभिषेक ,महापूजा, महाआरती करण्यात आली. सकाळी ८ वाजता पांडुरंग विद्या मंदिरातील शाळेतील विद्यार्थ्यांची व परिसरातील विविध दिंड्या मंदिरामध्ये आल्या होत्या. यामध्ये बालवारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह विविध संतांच्या वेशभूषा अगदी हुबेहूब परिधान केल्या होत्या. दिवसभर मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने भजन सुरू होते. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात चिंब झाले होते. सायंकाळी ५ वाजता पालखीची मिरवणूक काढत ग्राम प्रदक्षिणा टाळ मृदंगाच्या गजरात पार पडली.
कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता
सायंकाळी 6 वाजता संगीत विशारद पं. हरिश्चंद्र गवारे यांची सुरेल अभंगवाणी संपन्न झाली. रात्री ९ वाजता ह. भ. प हिरामण महाराज कर्डिले यांची सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. दिवसभराची नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हनुमान तरुण मंडळ व विठ्ठल ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतल्याचे भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष जयेश शिंदे यांनी सांगितले.





