पुणे जिल्हा : गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा वापर

शेतकरी राजा हवालदिल ः चांगला दर असूनही विक्री घटली
लक्ष्मण गव्हाणे
कोरेगाव भीमा – गणेशोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी ग्राहकांची कृत्रिम फुले खरेदी करण्याकडे असलेल्या ओढीमुळे गेली महिनाभर कृत्रिम फुलांनी सजलेली दुकाने आज खाली होताना दिसली; मात्र यामध्ये अनेक महिन्यां पासून गणपती सणाची वाट पाहत असलेल्या शेतकरी राजाची झेंडूची फुले मात्र सायंकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडलेली पाहायला मिळाली.
जिथं आरती करायला रेडिमेड यंत्र आलं आहे, जिथं प्रसाद वाटायला रेडिमेड तंत्र आलं आहे, तिथं देवाला वाहायला ताजीतवानी फुलं तरी कशी मिळायची? प्लॅस्टिकच्या फुलांनी जिवंत फुलांनाच नाही, तर संपूर्ण मार्केटला काबीज केलं आहे. 80 टक्के सजावटी या प्लॅस्टिक फुलांनी सजल्या आहेत. ती स्वस्त आहेत असंही नाही; मात्र एकदा खरेदी केल्यावर वर्ष-दोन वर्षे वापरता येतात, म्हणून ग्राहक खूश. खरंतर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुवासिक, ताजी फुले पुण्यातील मार्केट यार्डात रोज येतात. तिथून जिल्हाभरातील फुल व्यावसायिक, हार तोरण बनवणारे व्यावसायिक खरेदी करत असतात मात्र काही दिवसांपासून सणासुदीला ओरिजनल फुलांची आरास केवळ 20 टक्केच होते. परंतु आकर्षक सजावटीसाठी प्लास्टिक फुले, पाने, तोरणे, फुलांच्या माळांची रेलचेल बाजारपेठेत आहे. अगदी 20 रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत प्लास्टिकचे सजावट साहित्य मिळते. फुले 20 रुपयांना 5, माळा 20 रुपयांना 1, तर 50 रुपयांना 3 अशा मिळतात. पानांचे वेल, गवताचा बेस, फुलांचे लटकन असे विविध प्रकार बाजारात सजले आहेत.
आकर्षक रंग आणि वर्ष-दोन वर्षे टिकण्याची गॅरंटी यामुळे ग्राहक अशा वस्तूंकडे आकर्षित होतात. परंतु याचा फटका निसर्गाला आणि पर्यायाने आपल्यालाच बसणार आहे याची जाणीव आताच व्हायला हवी. प्लास्टिकची ही फुले हव्या त्या रंगात, विविध आकारांत, थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे आकर्षक पद्धतीने बनविलेली असतात. शिवाय ही फुले हाताळायला सोपी असल्याने ग्राहक या प्लॅस्टिकच्या फुलांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिकचा वापर करून झेंडूच्या फुलांच्या माळा, तोरणे बनवली जातात. हे निसर्गाला हानिकारक आहे. देखावा आणि दिखावा यामागे लागलेल्या ग्राहकांची मानसिकता ओळखून प्लॅस्टिक सजावटीच्या वस्तूंची रेलचेल दिसत आहे. गणरायाला वंदन करण्यासाठी बळीराजाला मदत होईल आणि निसर्गात पुन्हा निर्माल्य मिसळून जाईल अशी कृती झाली, तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल असे वाटत असले तरी यंदाचा गणेशोत्सव ओरिजनल नाही तर कृत्रिम फुलांनी सजलेला पाहायला मिळत आहे.
शेतकरी आशावादी
कुठलेही पीक घ्यायचं म्हटलं की, शेतकर्याला दोन तीन महिने आधी तयारी करावी लागते. शिरूर तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक असले तरी सणासुदीला फुलांचे चांगले पैसे होतील या आशेने शेतकरी फुलांची लागवड करत असतो; मात्र श्रावणाच्या पहिल्याच मोठ्या सणासाठी ग्राहकांनी ओरिजनल फुलाकडे पाठ फिरवल्याने दोन तीन महिन्यांपासून गणेशोत्सवाची वाट पाहणार्या शेतकर्याला आज सायंकाळी झेंडूची फुले फेकून देत असताना हवालदिल झाल्याचे पाहायला मिळाले.
दोन वर्षांपासून ग्राहकांनी कृत्रिम फुलांना पसंती देत ओरिजनल फुलांकडे पाठ फिरवली आहे. मागील काळात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. ओरिजनल फुलांच्या माळा बनवण्यासाठी, घरातील, मंडळातील डेकोरेशनसाठी कोकण, नाशिक जिल्ह्यांसह, खेड, हवेली जुन्नर तालुक्यांतील अनेक कारागीर पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये काम करण्यासाठी जात असत; मात्र मागील दोन वर्षांपासून कृत्रिम फुले बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने शेतकर्यांवर त्यासोबतच फुलांचे हार तोरण बनवणार्या अनेक कारागिरांचा रोजगार बुडाला आहे.
-बाळासाहेब मछिंद्र गव्हाणे, फुलांचे व्यापारी





