पुणे जिल्हा : पूर्व हवेलीत अवकाळीने दाणादाण

थेऊर – पूर्व हवेलीत जोरदार वा-यासह अवकाळी पावसाने मागील दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. या वादळी वार्यामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरीच नव्हे तर व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक यांचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
आळंदी म्हातोबा येथे आठ एकर क्षेत्रात पोपट गोते यांची फुल नर्सरी असून याठिकाणी त्यांनी सन्मित्र बँकमधून 95 लाखांचे आर्थिक सहाय्य घेऊन रोपांसाठी अत्याधुनिक पॉली हाऊस बांधले होत; परंतु कालच्या जोरदार पावसाने व वार्याने या पॉलीहाऊसचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. पुढील आठवड्यात मार्केटमध्ये येणार्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. नर्सरित विविध विदेशी प्रकारांची फुल रोपे तयार केली जातात.
ज्याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे; परंतु हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे निघून गेला आहे. आज मार्केटमध्ये या तयार झालेल्या रोपांची किंमत दीड कोटींच्या घरात होती, अशी माहिती रितेश राज रोझ नर्सरीच्या मालकांनी दिली आहे व नुकसानभरपाई शासनाने द्यावी ही विनंती केलेली आहे. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार यांनी सकाळी गाव भेट दौरा केला. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदय शंकर जवळकर, तेजस शिवरकर, आबासो जवळकर,माऊली माथेफोड,दयानंद शिवरकर आदी कार्यकर्ते व महसूल,महावितरण कर्मचारी उपस्थित होते. त्याचसोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व सुदर्शन चौधरी यांनी देखील गावभेट दौरा करून बाधित शेतकर्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत संजय जवळकर, प्रकाश जवळकर, गोकुळ क्षीरसागर व काळू भोंडवे आदी कार्यकर्ते होते.
महावितरणचे मोठे नुकसान
आळंदी म्हातोबा येथे एकूण 34 विजेचे खांब तुटून नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी शेतातील पिके भुईसपाट झालेली आहेत. पपईच्या बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. भोंडवेदरा येथे वीज कोसळून जवळकर यांच्या घराचे नुकसान झालेले आहे. रस्त्याच्या मधोमध अनेक बाभळी पडून विजेच्या तारा तुटलेल्या आहेत.
सलग दोन दिवस आलेल्या या वादळी पावसाने शेतकर्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाला मी विनंती करतो की, त्वरित पंचनामे करावेत व बाधित शेतकर्यांना लवकरात लवकर मदत करावी.
-अशोक पवार, आमदार शिरूर हवेली
गावात वादळी पावसाने विजेचे खांब तुटून शेतकरी व सर्वसामान्य लोकांचे खूप हाल झाले आहेत. मी महावितरणचे अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क केलेला असून जास्तीचे मनुष्यबळ लावून आजच्या आज शक्यतो वीज सेवा पूर्ववत करण्याची विनंती केलेली आहे. तसेच बाधित शेतकर्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे काम करत आहे.
-प्रदीप कंद, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद





