Pune District : शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात प्रत्येकी दोन आवर्तने

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सणसर जोड कालव्याला खडकवासला प्रकल्पाच्या मंजूर पाणी वाटपातील तरतुदीनुसार पाणी सोडणे बंधनकारक असून या सणसर जोड कालव्याला आराखड्यात तरतूद केल्याप्रमाणे पाणी सोडण्यात यावे. ते 22 गावांना शेती सिंचनासाठी देण्यात यावे, अशी आग्रही मागणी राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याला दोन व नीरा डाव्या कालव्याला दोन आवर्तने देण्याचा निर्णय, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
खडकवासला व नीरा डावा दोन्ही कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे. तसेच जास्तीत जास्त काळ इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या शेती सिंचनासाठी आवर्तन द्यावे. तसेच तरंगवाडी तलावाच्या पाण्यावर इंदापूर शहर व अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या तलावात पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी या बैठकीत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. यावर पाणी परिस्थिती पाहून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी दिले.
खडकवासलाचे आवर्तन
यावेळी खडकवासला कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी 18 फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन संपल्यानंतर शेतकर्यांच्या हितासाठी येत्या 25 एप्रिलपासून दुसऱे आवर्तन देण्यात यावे. अशी आग्रही मागणी शेतकर्यांच्या हितासाठी भरणे यांनी या बैठकीत केली. ही मागणी विचारात घेऊन दुसरे आवर्तन येत्या 25 एप्रिल पासून सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत अधिकार्यांना दिले.
नीरा डावा कालव्याचे आवर्तन
नीरा डावा कालव्यातून इंदापूरच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार निरा डाव्या कालव्याला 11 मार्च ते 3 मे या कालावधीत 54 दिवसाचे उन्हाळी हंगामातील पहिले तर 4 मे ते 26 जून या कालावधीत 54 दिवसाचे दुसरे उन्हाळी हंगामातील आवर्तन शेती सिंचनासाठी दिले जाणार आहे.





