Pune District : लाचखोर पोलीस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

बारामती : अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी करीत १० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करणाऱया सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील माणिक जगताप यांच्यासह लाच मागणीला खासगी व्यक्ती प्रवीण भाऊसाहेब भोसले या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
जगताप हे येथील तालुका पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर भोसले हा खासगी इसम आहे. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराविरोधात अपघातप्रकरणी एक तक्रार दाखल होती. त्यावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि तो दाखल झाला तर त्यात अटक न करण्यासाठी जगताप यांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती १० हजार रुपये लाच मागण्यात आली होती. प्रवीण भाऊसाहेब भोसले या खासगी व्यक्तीने लाच मागणीस प्रोत्साहन दिले होते. तक्रारीची शहानिशा करत अखेर सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील जगताप व खासगी व्यक्ती भोसले या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





