पुणे जिल्हा : अस्तरीकरणाच्या बैठकीत दोन गट भिडले

बारामतीत प्रचंड गोंधळ : पोलीस प्रशासनाची मध्यस्थी : अस्तरीकरणाला विरोध, समर्थनार्थही कार्यकर्ते आक्रमक
बारामती – नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणसंदर्भात बारामतीतील जलसंपदा कार्यालयात बोलावलेली बैठक आज प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजीने कोणत्याही निर्णयाविना पार पडली. अस्तरीकरण नको म्हणणाऱ्यांच्या बाजूने बोलावलेल्या बैठकीत अस्तरीकरण हवे, असे म्हणणारे शेतकरी देखील आल्याने प्रचंड गोंधळ बैठकीत उडाला.
जिल्हा शेतकरी कृती समिती व कालवा बचाव समितीसह विविध शेतकऱ्यांची शुक्रवार (दि.16) बारामतीच्या जलसंपदा कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीत जलसंपदा खात्याचे अधिकारी यासंदर्भातील भूमिका मांडणार होते. शेतकऱ्यांच्या शंकांना उत्तर देऊन शेतकऱ्यांच्या सूचनांचा परामर्श घेणार होते.
प्रत्यक्षामध्ये अस्तरीकरण नको म्हणणाऱ्यांबरोबरच अस्तरीकरण हवे असे म्हणणारेही शेतकरी आल्याने शेतकऱ्यांमध्येच दोन गट पडले. सुरुवातीस कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी नीरा डावा कालवा अस्तरीकरणासंदर्भात शासनाची म्हणजे जलसंपदा खात्याची भूमिका मांडली. त्यानंतर काही वेळातच या गोंधळाला सुरुवात झाली.
एकाच बैठकीत दोन परस्परविरोधी विचाराचे शेतकऱ्यांचेच गट आल्याने पाहता पाहता गोंधळ वाढला. प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. बैठकीस शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, माळेगावचे संचालक मदनराव देवकाते यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने आले होते.दरम्यान, यासंदर्भात जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनीच अस्तरीकरण हवे असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना बोलवल्याने गोंधळाची भर पडल्याचे मत येथे आलेल्या शेतकऱ्यांनी मांडले. तर दुसरीकडे आम्ही कोणालाही या किंवा नको, असे म्हटलेले नव्हते अशी भूमिका प्रशासकीय सूत्रांनी मांडली.
दरम्यान, सतीश काकडे यांनी यासंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक बोलावू, असे सांगितले. आपण अस्तरीकरण नको, असेच म्हणत आपली बाजू मांडली होती. परंतु या ठिकाणी अस्तरीकरण हवे, असे म्हणणारे देखील शेतकरी आल्याने बैठकीत कोणतीही सकारात्मक चर्चा झाली नाही, असे काकडे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.
वातावरण तणावपूर्ण बनल्याने बैठक आटोपली
गोंधळाची परिस्थिती दिसताच बारामती शहर पोलिसांनी जलसंपदा कार्यालयाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना पाणी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, मात्र, येथे दोन परस्परविरोधी विचाराचे शेतकरी असल्याने कोणत्याही परिस्थितीची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता आपण सर्वांनी आपापल्या लोकशाही मार्गाने स्वतंत्र भूमिका मांडावी, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था गंभीर निर्माण होऊ नये याकरिता ही बैठक येथे संपवावी, अशी विनंती केली त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.





