Pune District : इंदापुरात तुकोबांचे उत्साहात स्वागत

परतीच्या वाटेवर असताना नागरिकांनी घेतले पादुकांचे दशन
इंदापूर – पंढरीच्या पाडुंरगाचे मनोभावे दर्शन घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर आहे. इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील मुक्काम आटपून सोहळा रविवारी (दि. 13) सकाळी इंदापूर शहरात दाखल झाल्याने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्षा अलका ताटे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे, गिरीश शहा, गणेश महाजन, भारत बोराटे, सलीम बागवान, कुशाल कोकाटे, आरशद सय्यद, हमीद अत्तार, महादेव चव्हाण तसेअ इंदापूर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व इंदापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखीतील पादुकांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने इंदापूरकरांनी रांगा लावल्या होत्या. सकाळचा नाष्टा शहरवासीयांनी वारकर्यांना दिला. तद्नंतर गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी येथे विसावा व गोखळी गोफणे वस्ती येथे, महाप्रसाद समस्त गोफणे परिवारातर्फे पालखी समवेत वारकर्यांना देण्यात आला.
मागील वर्षी काही नागरिकांच्या मागणीसाठी पालखी वडापुरी येथून रामकुंड मार्गे पुढे मार्गस्थ होणार होते. मात्र, मागील वर्षीच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विरोध दर्शवून पालखी सालाबादप्रमाणे जात असणार्या मार्गाने जावी, असे पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षरीच्या निवेदन पालखी प्रमुखांना सहा महिन्यांपूर्वी देण्यात आले होते.
या सर्व निवेदनाची दखल घेऊन संस्थान प्रमुखांनी गोखळी, इंदापूर, तरंगवाडी, विठ्ठलवाडी, झगडेवाडी येथील ग्रामस्थांना आश्वासन दिले होते, की पालखी दरवर्षी सलाबादप्रमाणे असणार्या मार्गाने जाणार त्याप्रमाणे ठरलेल्या वेळापत्रकानुसार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा परतीचा पालखी सोहळा दिलेल्या शब्दाप्रमाणे व परंपरेप्रमाणे आला. त्यामुळे विशेष आनंद गावकर्यांनी व्यक्त केला.





