Pune District : गरीब-श्रीमंत दरी कमी करायचा प्रयत्न करा

राजगुरूनगर : फक्त भाषणाने समाज बदलत नाही तर दिलेल्या शब्द पाळणे आणि तसे करून दाखवणे हे राजकीय नेत्याचे काम आहे सरपंचानी गाव हे कुटुंब समजून काम करावे. तसेच शासनाच्या योजना राबविताना गरीब-श्रीमंत दरी कमी करायचा प्रयत्न झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खेड तालुक्यातील सरपंचांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
खेड तालुका सरपंच परिषद अंतर्गत राळेगणसिद्धी व आदर्श गाव हिवरे बाजार येथे सरपंच परिषेदेचे अध्यक्ष मनोहर पोखरकर, जिल्हा समन्वयक कुंडलिक कोहिनकर, महिला अध्यक्षा प्रतीक्षा पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौर्याचे रविवारी (दि. 16) करण्यात आले होते. यावेळी सरपंचांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे बोलत होते. यावेळी खेड तालुक्यातील 32 गावांतील सरपंचासह नगर जिल्ह्यातील अनेक गावातील सरपंच सदस्य उपस्थित होते.
अण्णा हजारे म्हणाले, समाजात भाषणे देणारे खूप लोक आहे; मात्र ते तसे वागत नाहीत त्यामुळे त्यांचा समाजावर प्रभाव पडत नाही. तुम्ही जे समाजाला सांगता त्यावेळी त्यांचे लक्ष तुमच्याकडे असते. म्हणून कृती आणि शब्दाला महत्त्व दिले पाहिजे. मी कसा वागतो याकडे लोक पाहतात. गावाचा विकास साधण्यासाठी गावातील लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. गावात कुटुंबातून एका माणसाने श्रमदान करावे. सरपंच म्हणून काम करताना कृतीची जोड द्यावी. जनतेची सेवा करताना आनंद मिळतो गाव हाच प्रपंच आहे, असे त्यांनी नमूद केले.
राळेगणसिद्धी नंतर सहभागी सरपंचानी हिवरे बाजार गावाला भेट दिली. तेथील विकास, शासकीय योजना योजना, ग्रामपंचायतीचा कारभार याबाबत माहिती घेतली. जिल्हा समन्वयक कुंडलिक कोहिनकर यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच सोनल टोपे यांनी आभार मानले.





