पुणे जिल्हा : नितीन जाधव यांचे दुर्ग भ्रमंतीचे त्रिशतक

स्वराज्याची पहिली राजधानी राजगडापासून 2011 मध्ये केली होती सुरूवात
सासवड : भटकंती करायची ती स्वतःच्या आनंदासाठी, आरोग्यासाठी, कधी छायाचित्रणासाठी तर कधी पर्यावरणाच्या अभ्यासासाठी; पण इतिहासावरच्या श्रद्धेतून हीच भटकंती केवळ रेकॉर्ड म्हणून न करता समाज आणि निसर्गासाठी करत दिवे येथील ट्रेकर नितीन दिलीप जाधव यांनी नुकतच दुर्ग भ्रमंतीचा त्रिशतक पूर्ण केले.
स्वराज्याची पहिली राजधानी राजगडापासून 2011 मध्ये सुरू झालेल्या भटकंतीची त्रिशतकी खेळी त्यांनी तालुका अकोले येथील भैरवगड (शिरपुंजे) गडावर पूर्ण केली त्यांच्या 300 दुर्गांमध्ये दुबई येथील एक आणि मॉरिशस येथील एक अशा परदेशातील दोन गडांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणार्या जाधव यांनी त्रिशतकी दुर्ग भ्रमंतीत गडकोटावर प्लॅस्टिक प्रदूषण होऊ देऊ नका, असा संदेश देण्याचे कामही केले आहे. या प्रवासात त्यांना त्यांच्या आई-वडिलांसह पत्नी आणि कुटुंबाची उत्तम साथ मिळाल्याचं त्यांनी सांगितले.
पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, वसई, या जिल्ह्यातले सगळे गड त्यांनी पाहिला स्वराज्याची पहिली राजधानी दुर्गराज राजगड पाहिल्या नंतर सह्याद्रीतील गडकोटांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले तो प्रत्येक गड पाहण्याची ओढ मनात निर्माण झाली असे सांगितले.
सध्या सर्वत्र उत्तम आरोग्याचे महत्त्व वेगवेगळे होणारे आजारामुळे लोकांना पटले आहे. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात असलेली प्रेरणा अखंड टिकून तरुण पिढीमध्ये जागृती होऊन एक संस्कृत जबाबदार नागरिक तयार व्हावा.
मोबाइल इंटरनेटवर वर्षभर चिकटून बसलेल्या तरुणांना आपल्या लाभलेला ज्वलंत इतिहासाची ओळख होऊन, वाचन लेखन संस्कृतीची निर्मिती व्हावी सह्याद्रीची संपन्नता टिकून राहावी या हेतूने नितीन जाधव किल्ले भ्रमंतीच्या मोहिमा राबवत आहेत. दुर्ग महर्षी प्रमोद मांडे भगवान चिले यांच्या पुस्तकातून मोलाचे मार्गदर्शन मिळाले, यापुढेही भ्रमंती सुरू राहणार आहे असे त्यांनी सांगितले.





